चंद्रपूर : वेगळ्या विदर्भासाठीविदर्भवाद्यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार हाती घेतले आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने २८ सप्टेंबरपासून आंदोलनाची मालिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
विदर्भ राज्याच्या मागणीकरिता जागे मारबत करत २८ सप्टेंबर रोजी विदर्भातील सर्व जिल्ह्यात व तालुका मुख्यालयी कालबाह्य झालेल्या व विदर्भातील जनतेची फसवणूक करणाऱ्या नागपूर कराराची होळी करण्यात येणार आहे. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीचे औचित्य साधून कार्यकर्ते जिल्हा व तालुका स्थळावर महात्मा गांधी, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले वा अन्य थोरांच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन करतील.
मिशन-२०२३ अंतर्गत आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी ॲड. वामनराव चटप यांनी दिला. यावेळी पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार, विदर्भ प्रदेश युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, जिल्हाध्यक्ष किशोर दहेकर, विदर्भ सचिव मितीन भागवत, शहर अध्यक्ष अनिल दिकोंडावार, शहर समन्वयक गोपी मित्रा, मारोतराव बोथले, मरेश नळे, संध्याताई केदार नागपूर जिल्हा अध्यक्ष सुधाताई पावडे व प्रशांत जयकुमार उपस्थित होते.
प्रशासनाला देणार निवेदन
३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री अमित शहा यांना निवेदन पाठवून तत्काळ विदर्भाची निर्मिती करून ११७ वर्षे जुनी मागणी निकाली काढण्याची मागणी करण्यात येणार आहे. तसेच विदर्भातील सर्व खासदारांना पत्र पाठवून ‘ विदर्भाबाबतची भूमिका काय ? ’, असे स्पष्ट करावे, अशी मागणी करण्यात येणार आहे.