चंद्रपूर : दुरूनच साप दिसला तरी मोठी घाबरगुंडी उडते. अशातच चक्क खिशातच साप निघाला तर कल्पनाच करवत नाही; परंतु ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जिप्सी चालक प्रमोद गायधने यांच्या खिशात शनिवारी मांजऱ्या जातीचा साप निघाला. सुदैवाने बिनविषारी साप असल्याने कोणतीही धोका झाला नाही. मात्र, खिशात साप दिसताच जिप्सी चालक गायधने यांची बोबडीच वळली होती. खिशातून साप काढतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाला सोमवार, दि.१ जुलैपासून पावसाळी सुटी लागत आहे. पावसाळ्यात ताडोबा कोर झोनमधील पर्यटन पूर्णपणे बंद असते. प्रकल्प तीन महिन्यांसाठी बंद होणार असल्याने शनिवार व रविवार, असे दोन दिवस पर्यटकांची चांगलीच गर्दी ताडोबात होती. अशातच शनिवार, दि.२९ जून रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जिप्सी चालक प्रमोद गायधने हे सकाळी सफारीसाठी तयारी करत होते. दरम्यान, त्यांनी शर्ट घातला.
शर्ट घातल्यानंतर काहीतरी वळवळ जाणवली. त्यांना वाटले शर्टाच्या आत काहीतरी दोरी किंवा अन्य काही फसले असावे. मात्र, त्यांनी बघितले असता तिथे त्यांना मोठा साप दिसला. साप दिसताच गायधने यांची बोबडी वळली. त्यांनी कशीतरी हिंमत केली व सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, साप काही केल्या बाहेर निघत नव्हता. यावेळी त्याच परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांचे तज्ज्ञ अभ्यासक स्वर्णा चक्रवर्ती उपस्थित होते. त्यांना बोलाविण्यात आले. त्यांनी साप काढण्याच्या काठीने अगदी अलगद सापाला शर्टाच्या बाहेर काढले. शर्टात निघालेला साप मांजऱ्या बिनविषारी होता. तरीही सापाला बघून गायधने यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्यांची बाेबडी वळली होती. दरम्यान, या सापाला नंतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सोडून देण्यात आले.
मला याविषयी माहिती मिळाली आहे. परंतु, मी चित्रफीत बघितली नाही. चित्रफितीतील सत्यता पडताळून बघतो.-सितामय दुबे, वनपरिक्षेत्र अधिकारी, कोलारा गेटकोलारा वनविकास महामंडळाच्या कार्यालय परिसरात असलेल्या बेंचला मी शर्ट अडकवून ठेवला होता. थोडावेळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा शर्ट घातला. तेव्हा मला थंड-थंड वाटत होते. खिशात हात घातल्याबरोबर साप असल्याची जाणीव झाली. रिसार्टमधील सर्पमित्र स्वर्णा चक्रवर्ती यांनी बोलावले. त्यांनी सापाला व मला कोणतीही इजा न होऊ देता अत्यंत शिताफीने साप बाहेर काढला.-प्रमोद गायधने, जिप्सीचालक