साईनाथ कुचनकार/ चंद्रपूर: कोरपना तालुक्यातील कुकुडसाथ हे गाव केंद्र सरकार राबवीत असलेल्या लाईट हाऊस योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. या योजनेद्वारा सीएसआर कंपनी व शासनाच्या समन्वयातून गावाचा विकास केला जाणार आहे. गावातील विकासकामासंदर्भात माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने राज्यस्तरीय चमू कुकुडसाथ या गावात धडकली असून, तेथील कामाची पाहणी केली.
कुकुडसाथ हे गाव आदिवासी बहुल असून, गाव हागणदारी मुक्त आहे. त्यामुळे या गावाचा समावेश प्रायोगिक तत्त्वावर लाईट हाऊस या योजनेत करण्यात आला आहे. गावात शाश्वत विकास कसा करता येईल, यावर प्रयत्न केले जात आहेत. गावात स्वच्छता व पिण्याचे पाणी यावर सतत जनजागृती केली जात असून, गावातील सर्व भिंती बोलक्या करण्यात आल्या आहेत.
गावात घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केले जात आहे. याच कामाची पाहणी करण्याकरिता कोरपना तालुक्यातील कुकुडसाथ गावाची राज्यस्तरीय चमूने पाहणी केली.
केलेल्या कामाचे राज्यस्तरीय चमूचे मुख्य असेलेले गडचिरोली जिल्हा परिषदचे जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक फरेंद्र कुतीरकर यांनी कौतुक केले. यावेळी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक नूतन सावंत, स्वच्छ भारत मिशनचे समाजशास्त्रज्ञ प्रकाश उमक, माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ कृष्णकांत खानझोडे, स्वच्छता तज्ज्ञ तृशांत शेंडे, गडचिरोली जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अमित मानुसमारे, स्वच्छता तज्ज्ञ अमित पुंडे, सरपंच, ग्रामसेवक किशोर डपकस, गटविकास अधिकारी विजय पेंदाम, आदींची यावेळी उपस्थिती होती.