विसापूर (चंद्रपूर) : बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावरील सन्मित्र सैनिक शाळेत भावाच्या ११ वीची प्रवेशप्रक्रिया आटोपून आपल्या वडिलांसोबत दुचाकीने मुख्य मार्गावर येताच अज्ञात वाहनाने चिरडल्याने बी.एस.सी. द्वितीय वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. १५) रोजी दुपारी ४:२५ वाजताच्या सुमारास घडली. वेदांती युवराज चिंचोलकर (२१) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेत वडील युवराज चिंचोलकर (रा. विसापूर) हे गंभीर जखमी झाले असून, प्रकृती चिंताजनक आहे.
विसापूर येथील युवराज चिंचोलकर यांचे कुटुंब सर्वसाधारण परिस्थितीत वाढले. मुलगा कुणाल याने नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावरील सन्मित्र सैनिक शाळेत कुणालला ११ वीत प्रवेश घेण्यासाठी वडील युवराज चिंचाेलकर व मुलगी वेदांती हे दोघे दुपारी ३ वाजताच्या सुमारास एमएच ३४ - बीएन ५८४८ क्रमांकाच्या दुचाकीने गेले होते. विद्यालयातील प्रवेशाचे काम आटोपून राज्य महामार्गाने चंद्रपूरकडे वळत असतानाच भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत वेदांती व वडील युवराज रस्त्यावर कोसळले. त्या वाहनाने दुचाकीला बऱ्याच अंतरावर फरफटत नेले. दुचाकीचा चेंदामेंदा झाला. यात वेदांतीला जोरदार मार लागला. वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले. दरम्यान, काही वेळाने याच मार्गावरून रुग्णवाहिका आल्याने जखमी वेदांती व वडील युवराज यांना चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान वेदांतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. वडिलांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून, प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
विसापुरातील सारेच सुन्न
मृत वेदांती चिंचोलकर ही हुशार व मनमिळावू विद्यार्थिनी होती. चंद्रपुरातील सरदार पटेल महाविद्यालयात ती बी.एस.सी. द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होती. भाऊ कुणाललाही चांगले शिक्षण मिळावे, यासाठी सैनिक विद्यालयाचा पर्याय सुचवून ती वडिलांसोबत प्रवेश घेण्यासाठी दुपारी गेली. मात्र, ती आता घरी कधीच परत येणार नाही. तिच्या दुर्दैवी मृत्यूची माहिती मिळताच गावकरी सुन्न झाले.
आणखी किती बळी घेणार?
बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांची वर्दळ सुरू होती. मात्र, याच मार्गावर सन्मित्र सैनिक तसेच केंद्र शासनाची सैनिकी शाळा असल्याने या दोन संस्थांमध्ये ये-जा करणाऱ्यांची संख्या बरीच असते. मात्र, नेमके याच ठिकाणी मार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने काही प्रतिबंधात्मक उपाययोजना नाही. त्यामुळे थोडी नजर चुकली तर भीषण अपघाताचा धोका असतो. वेदांती चिंचोलकर या विद्यार्थिनीच्या मृत्यूने आणखी किती बळी घेणार, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.