लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : प्रसिद्ध समाजसेवक दिवंगत बाबा आमटे स्थापित गजबजलेल्या आनंदवनातील वसाहतीत आई- वडिलांसोबत राहणाऱ्या एका युवतीची भरदिवसा धारधार शस्त्राने हत्या केल्याची खळबळजनक घटना २६ जूनच्या रात्री ९ वाजता उघडकीस आली. आरती दिगंबर चंद्रवंशी (२४) असे मृतक युवतीचे नाव आहे.
हत्येनंतर आरोपी युवतीचा मोबाइल घेऊन फरार झाला. आनंदवनातील संधीनिकेतन शाळेजवळील वसाहतीत दिगंबर चंद्रवंशी हे पत्नी व मुलगी आरतीसह बऱ्याच वर्षांपासून वास्तव्याला आहेत. दिगंबर व त्यांची पत्नी दिव्यांग आहे. २६ जूनला सकाळी आई-वडील काही कामानिमित्त सेवाग्राम येथे गेले. त्यावेळी आरती घरी एकटीच होती.
दुपारी ४ वाजेच्या सुमारास वडील दिगंबर यांनी आरतीला अनेकदा फोन केला. मात्र, तिचा भ्रमणध्वनी बंद असल्याचे आढळून आले. सेवाग्राम येथील काम आटोपून रात्री ९ वाजता दोघेही पती-पत्नी आनंदवन वसाहतीमधील आपल्या खोलीत आले. दरवाजा उघडून आत गेले असता मुलगी आरती ही स्नानगृहात रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून हंबरडा फोडला. या घटनेची माहिती वरोरा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता धारदार शस्त्राने वार करून आरतीची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. आनंदवनात दिवसभर रेलचेल असताना भरदिवसा युवतीची हत्या होणे याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी आनंदवनातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. दरम्यान, पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी नयोमी साटम, पोलिस निरीक्षक अमोल काचोरे आदींनी घटनास्थळी भेट दिली. चंद्रपूर गुन्हे शाखेच्या पथकाला पाचारण करून तातडीने तपास सुरू केला.
घटनास्थळावर श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद जांभुळे यांना विचारले असता ते म्हणाले की, सदर घटना ही दुपारच्या सुमारास घडली असावी. आरोपीने शस्त्र आणि आरतीचा मोबाइल सुद्धा सोबत नेला.
चौकशीसाठी एकाला घेतले ताब्यातया प्रकरणाबाबत पोलिसांनी अतिशय गोपनीयता पाळली आहे. या प्रकरणात पोलिसांनी २७ जूनला सकाळच्या सुमारास समाधान माळी (रा. चोपडा, जि. जळगाव) हल्ली मुक्काम वरोरा याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ही हत्या प्रेमप्रकरणातून झाली असावी, असा अंदाज परिसरात वर्तविण्यात येत असला तरी पोलिस याबाबत कुठलीही माहिती द्यायला सध्या तयार नाही. पूर्ण चौकशीअंती हत्या कुणी केली व हत्येमागील कारण काय, हे कळेल, असे तुर्तास पोलिसांचे म्हणणे आहे.