चंद्रपूर : आम आदमी पार्टीच्या किसान आघाडीचा मोर्चा राज्य संयोजक सुभाष वारे यांच्या नेतृत्त्वात शुक्रवारी चंद्रपुरात काढण्यात आला. आझाद बगिचा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आलेल्या या मोर्चाचे विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे, विदर्भ सचिव जगजीतसिंग यांनी नेतृत्व केले.जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांचे द्वारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या कर्जमाफी, स्वामीनारायण आयोग लागु करा, शेतमालाला ५० टक्के नफ्यासह भाव द्या, बियाणे व खताचा काळाबाजार बंद करा, जंगली जनावरांपासून शेताच्या होणाऱ्या नुकसानीची व्यावहारिकपणे भरपाई करा, दुष्काळीभागात योग्य नुकसान भरपाई करा, वीज जोडण्या द्या, जलयुक्त शिवाराची कामे सार्वत्रिक करा, रोजगार हमी योजनेची कामे प्रामाणिकपणे व्हावी, चंद्रपूर जिल्हा प्रदूषण मुक्त करा आदी मागण्यांचा समावेश होता. आमआदमी पार्टी चंद्रपूर ग्रामीणचे संयोजक अॅड. किशोर पुसलवार, सचिव दीपड गोंडे, चंद्रपूर शहर मनपा संयोजक प्रशांत येरणे, सिंदेवाहीचे मनोहर पवार, बल्लारपूरचे परमजीतसिंग, नागभीडचे सुरेश कोल्हे, चंद्रपूर शहरचे अॅड. राजेश विराणी, सुनील मुसळे, सूर्यकांत चांदेकर, भीवराज सोनी, संतोष दोरखंडे, संदीप पिंपळकर, आकाश गड्डमवार, अशोक आनंदे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. (स्थानिक प्रतिनिधी)
आमआदमी पार्टी किसान आघाडीचा मोर्चा
By admin | Published: June 18, 2016 12:38 AM