गजानन गावंडे : बल्लारपुरात पार पडला कार्यकर्ता मेळावा बल्लारपूर : काँग्रेसला स्वातंत्र्योपूर्व काळापासून चळवळीचा इतिहास आहे. जनमानसात काँग्रेसची विचारसरणी रुजली आहे. केंद्र व राज्यातील विद्यमान सरकारने सत्तेवर आल्यावर जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य मतदारांचा भ्रमनिरास झाला आहे. आता मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जावे. काँग्रेसला विजयी करण्यासाठी आपआपसातील मतभेदाला तिलांजली द्यावी, असे आवाहन शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे यांनी शनिवारी येथे केले. बल्लारपूर तालुका व शहर काँग्रेसच वतीने आगामी नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक बालाजी सभागृहात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा तालुकास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानावरुन गावंडे बोलत होते. मेळाव्याला प्रमुख पाहुणे बल्लारपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, नगराध्यक्ष छाया मडावी, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, पंचायत समितीचे उपसभापती अनकेश्वर मेश्राम, माजी सभापती अॅड. हरीश गेडाम, माजी नगराध्यक्ष सुनंदा आत्राम, काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष तारासिंग कलशी, वसंतराव मांढरे, नगरपरिषद गटनेते देवेंद्र आर्य, नगरसेवक नासीर खान, टी. पद्माराव, मनोहर फुलझेले, रामदास वाग्दरकर, गुलाबराव मुरकुटे, देवेंद्र बेले यांची उपस्थिती होती. याप्रसंगी गावंडे म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्यात माजी खासदार नरेश पुगलिया यांचे कणखर नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या नेतृत्व क्षमतेमुळे काँग्रेसची यशस्वी वाटचाल सुरू असून नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये अनेकांना संधी मिळाली. काँग्रेसची विचारसरणी पुरोगामी असून सर्वसामान्याच्या विकास करणारी आहे. याच विचारधारेवर काँग्रेसला जनता मतदान करते. आगामी नगर पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच विजयी होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, रामभाऊ टोंगे, घनश्याम मुलचंदानी, वसंत मांढरे, तारासिंग कलशी, देवेंद्र आर्य, अनकेश्वर मेश्राम, यांनी मार्गदर्शन केले. संचालन नगरसेवक नासीर खान यांनी तर आभार रामदास वाग्दरकर यांनी मानले. यावेळी नगरसेवक भास्कर माकोडे, करुणा रेकलवार, वेणुताई गौरकार, कविता खरतड, जयकरण सिंह बजवे यांच्यासह शहरातील व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
काँग्रेसच्या विजयासाठी मतभेदांना तिलांजली द्या
By admin | Published: July 31, 2016 1:47 AM