घुग्घुस : अपहरण होऊन ४८ झाले तरीही शुभम फुटाणे या २५ वर्षीय युवकाचा शोध लावण्यास पोलीस यंत्रणेला यश आले नाही. दोन दिवसात ३० लाखांची खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी अपहरणकर्त्याने दिली होती. एकदा शुभमच्या मोबाईलवर बोलणे झाल्यापासून कुठलाही संपर्क झाला नाही. त्यामुळे शुभमच्या आई-वडिलांची चिंता वाढली आहे.
रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास शुभम दिलीप फुटाणे हा अभियांत्रिकी झालेला युवक येथील वेकोलिच्या रामनगर कामगार वसाहतीमधील आपल्या क्वॉर्टरमधून मित्राकडे जातो म्हणून दुचाकीने निघून गेला. त्याची दुचाकी आढळली. मात्र शुभम परतला नाही. शुभमच्या आईने त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्याचे अपहरण झाल्याचे सांगून ३० लाखांच्या खंडणीची मागणी केली. ही रक्कम दोन दिवसात न मिळाल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर त्या अपहरणकर्त्याने संपर्क केला नाही. शुभमचाही शोध लागला नाही. पोलिसांनी शुभम ज्या मार्गाने गेला त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. मात्र काहीही उपयोग झाला नाही.