भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीतर्फे यशवंतराव शिंदे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे नवनिर्वाचित विधान परिषद आमदार ॲड. अभिजित वंजारी यांचा शाल ,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सत्कारमूर्ती आमदार अभिजित वंजारी, अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव डॉक्टर विवेक शिंदे ,चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष प्राध्यापक सूर्यकांत खनके, प्राचार्य डॉक्टर जयंत वानखेडे, डॉक्टर कार्तिक शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना याप्रसंगी अभिवादन करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना ॲड. अभिजित वंजारी यांनी गेल्या ५८ वर्षाचा इतिहास या निवडणुकीत मोडण्यात आल्याचे सांगितले.
शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवीन, दिलेल्या आश्वासनांचा पाठपुरावा करील, विदर्भातील सहा जिल्ह्यांच्या विकासाची जबाबदारी माझी असेल, असेही याप्रसंगी ते म्हणाले.
निवडणूक कशी जिंकायची हे ॲड. वंजारी यांनी आपल्या विजयाद्वारे दाखवून दिल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शिंदे यांनी सांगितले.
याप्रसंगी २००५ पूर्वीच्या नियुक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्यात यावी, या मागणीचे निवेदन तसेच संताजी स्नेही मंडळातर्फे निवेदन देण्यात आले. भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे राजू गैनेवार यांनी ॲड वंजारी यांचा सत्कार केला. संचालन डॉक्टर सुधीर मोते, प्रास्ताविक डॉक्टर जयंत वानखेडे तर आभार प्राध्यापक ढोक यांनी मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.