चंद्रपूर : भूमिपुत्र ब्रिगेड, अ.भा.म. फुले समता परिषद, अखिल भारतीय माळी महसंघाच्या वतीने सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या अखिल भारतीय म. फुले समता परिषदेच्या कार्याध्यक्ष शशिकला गावतुरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मूल येथील मा.सा. कन्नमवार सभागृहात ग्रंथतुला करून साजरा करण्यात आला. यावेळी गावतुरे परिवारातर्फे सामाजिक बांधिलकी जोपासणारे विविध उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे तर प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी विचारवंत नामदेव जेंगठे, माजी आमदार देवराव भांडेकर, नरेन गेडाम, झाडीबोली साहित्य परिषदेचे अध्यक्ष बंडोपंत बोढेकर, डॉ. सचिन भेदे, डॉ. राकेश गावतुरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर पार पडले. त्यानंतर शशिकला गावतुरे यांच्या बालकुंज व सावित्री वाणी या दोन कविता संग्रहाचे विमोचन करण्यात आले. त्यानंतर शशिकला गावतुरे यांचा ग्रंथतुला करून दहा ग्रंथालयाला स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकाचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. अभिलाषा गावतुरे, संचालन ॲड. प्रशांत सोनुले, बळीराज निकोडे, परिचय प्रा. माधव निकुरे तर आभार प्रा. सुरेश लोनबले यांनी मानले.
बॉक्स
शंभराहून अधिक गुणवंतांचा सत्कार
अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये दहावीतील २८ गुणवंत विद्यार्थी, बारावीतील २५, वक्तृत्व, कला, नाट्य स्पर्धेतील गुणवंत, सीआरपीएफमध्ये निवड झालेले १८ युवक, तीन उत्कृष्ट शेतकरी, स्पर्धा परीक्षेतील यशवंत यासह विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार यावेळी करण्यात आला.