राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पृथ्वीतलावर २०० दशलक्ष वर्षांपासून बांबूचे अस्तित्व असल्याचे पुरावे अनेक अभ्यासकांच्या संशोधनातून पुढे आले. जगभरात बांबूच्या १४०० प्रजाती आढळल्या असून भारतातही १४० बांबू प्रजाती विविध राज्यांमध्ये अस्तित्वात आहेत. त्यापैकी ६० प्रजातींची लागवड केली जाते. महाराष्ट्रात मानवेल, कटांग कटास, पिवळा बांबू, चिवळी, मानगा, कोंड्या मेस, चिवळीया, कळक मेज, चिवा, चिकरी हुडा आदी प्रजातींची लागवड होत असली तरी या सर्वच प्रजाती चंद्रपूर जिल्ह्यात निसर्गत: जोमाने बहरू शकतात, असे उत्तम व पोषक वातावरण आहे. त्यामुळे विकासाचा नवा दृष्टिकोन आणि बांबूचा औद्योगिक वापर वाढविण्याच्या हेतूने चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात रोपवाटिकेत वैशिष्ट्यपूर्ण १८ प्रजातींचा मूलभूत अभ्यास केला जात आहे. भविष्यात यातून बांबू आधारित उद्योगांची उभारणी होण्याची आशा निर्माण झाली.बांबू लागवडीसाठी बारमाही पडिक ते कायमस्वरूपी सुपीक, पाण्याचा निचरा होणारी जमीन जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहे. वनसंपदा व लागवडीखालील जमिनीचे क्षेत्र लक्षात घेतल्यास पाणथळ, क्षारपड जमिनीचे प्रमाण कमी असल्याचे कृषी विभागाच्या एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. उष्ण दमट हवामानात बांबू चांगला वाढतो, असे वनाधिकारी सांगतात. सिंचनाची सुविधा असल्यास ८ ते २५ अंशसेल्सिअस तापमान व सरासरी ७५० मिमी पाऊसमानाच्या स्थितीही बांबू लागवड सहज शक्य आहे. कोेकणापेक्षा विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्हे बांबू लागवडीसाठी उपयुक्त आहेत. बी, कांड्या, व कंदापासून बांबूची अभिवृद्धी करता येते. रोपवाटिकेमध्ये गादीवाफा तयार करून तसेच प्लॉस्टिक पिशवीमध्ये बियाणे घालून बियाणे वृद्धी करण्याच्या दोन पद्धती आहेत. बियाण्याची पेरणी केल्यानंतर साधारणत: दहा दिवसात उगवण होते. जिल्ह्याची माती व हवामान बांबूसाठी पोषक असल्याने देशभरातील विविध प्रजातींची लागवड करणे सहज शक्य आहे, अशी माहिती बांबू तज्ज्ञ परमेश्वरम कृष्णा अय्यर यांनी दिली.जिल्ह्यातील कटांग आणि मानगा या दोन प्रजाती अतिशय उत्तम पद्धतीने वाढू शकतात. बांबू संशोधक व प्रशिक्षण केंद्राच्या मदतीने या प्रजातींची माहिती पदविका शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना दिली जात आहे. बांबू बांधकाम, बांबूवरील प्रक्रिया, लागवडीचे उत्पादन, बांबू आधारीत बुरडकाम आदी विविध पैलूंची माहिती देऊन बीआरटी केंद्राने बांबू आणि रोजगाराभिमुख उद्योगांची सांगड घालण्याचे प्रकल्प नियोजित करण्यात आले आहेत. बांबू हे काष्ठ गवत विशिष्ट कालावधी व ठराविक क्षेत्रामध्ये मोठ्या जोमाने जैविक वस्तूमान तयार करू शकतो. वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र बांबू मंडळाचे संचालक टी. एस. के. रेड्डी, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांच्या मार्गदर्शनात विविध प्रकल्पांचे नियोजन सुरू आहेत.फर्निचर उद्योगाचा राजा ‘मानगा, कटंगा’मानगा ही बांबूची प्रजाती अत्यंत मजबूत असते. हा बांबू २० फूटांपेक्षाही अधिक वाढू शकते. घराचे छप्पर, सभा मंडप, कलाकुसरीच्या विविध वस्तू तयार करण्यासाठी याचा वापर होतो. याशिवाय कटांग काटस ही प्रजातीही अतिशय ताकदवान आहे. जिल्ह्यातील हवामान पोषक असल्याने हा बांबू १५ ते ३० मीटर उंची, व्यास ८ ते १५ से.मी.पर्यंत वाढू शकतो. सुक्ष्म विणकाम आणि फर्निचरसाठीदेखील वापर होतो. याच उपयोगितेमुळे राष्ट्रीय बांबू मिशनने १६ प्रजातींमध्ये ‘मानगा’ प्रजातीचा समावेश केला आहे. मानगा प्रजातीला कर्नाटकमध्ये सिर्म, बिदक, गोवा राज्यामध्ये कोंड्या आणि केरळमध्ये ‘ओवीये’ या नावाने ओळखला जातो.उद्योगाचे अर्थकारण बदलविणाऱ्या प्रजातीचिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात सध्या १८ प्रजातींचे संगोपन केले जात आहे. या प्रजातींची व्याप्ती वाढल्यास औद्योगिक विश्वाचे अर्थकारण बदलू शकते. त्यामुळे प्रजातींची व्यापक क्षेत्रात लागवड करणे अत्यंत गरजेचे आहे. केंद्रामध्ये संगोपन सुरू असलेल्या बांबू प्रजातींमध्ये अॅफीनीस, बालको, एस.चायनासिस, लांजी स्पेक्यूलेटा, लांजी स्ट्राईटा, लांजी टुल्डा, वल्गेरीस, वॉमीन, डेन्ड्रोक्लोफस अॅस्पर, अंदमानीका, लांजी सस्पेथस, मेमोरेनेसीएस, मॅलॅकोना बेसीफेरा, पी.आॅरा, पी. मानी, पी. जापनिका आदींचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरातून ‘कावळइडी’ ही प्रजात रोपवाटिकेत ठेवण्यात आली. या प्रजातीचे शास्त्रीय नाव अद्याप ठरले नाही. बांबूवर आधारीत विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व प्रजातींचे वैशिष्ठ्य, लागवड तंत्र, प्रक्रिया या संदर्भात मूलभूत मार्गदर्शन केले जात आहे.फुले आल्यास संपते बांबूची जीवनयात्रा...बांबूला चित्ताकर्षक फुले येतात. मात्र, प्रत्येक प्रजातींचा हंगाम वेगवेगळा असू शकतो. काही प्रजातींना एक किंवा अधिक वर्षांनंतर फुले येतात. तर काही प्रजातींना तब्बल ३० ते ६० वर्षांतून जोमदार फुले बहरतात. पण, फुलांचा हंगाम सुरू झाला की बांबूची जीवनयात्राच संपते...
बांबू प्रजातींमध्ये उद्योगाची क्षमता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 12:13 AM
पृथ्वीतलावर २०० दशलक्ष वर्षांपासून बांबूचे अस्तित्व असल्याचे पुरावे अनेक अभ्यासकांच्या संशोधनातून पुढे आले. जगभरात बांबूच्या १४०० प्रजाती आढळल्या असून भारतातही १४० बांबू प्रजाती विविध राज्यांमध्ये अस्तित्वात आहेत.
ठळक मुद्देपारंपरिक दृष्टिकोन बदलला : चिचपल्ली येथील रोपवाटिकेत १८ बांबू प्रजातींवर अभ्यास