राजेश मडावी, चंद्रपूर : शहरात मध्यमवर्गीय व सुखवस्तू कुटुंबांची संख्या बरीच आहे. त्यातील काहीजण प्रसिद्धीच्या आवरणात वावरू इच्छितात. मात्र, गांधीवादी सेवाभावी कार्यकर्ते गाडे गुरूजींच्या प्रेरणेतून सुरू केलेल्या महिला संस्कार कलश योजनेशी जुळलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांनी २५ क्षयरुग्णांना प्रोटीन डाएट मिळावे, यासाठी त्यांना दत्तक घेण्याचे धाडस दाखविले. यानंतर मदतीची पहिली किट जिल्हा टी. बी. हॉस्पिटलमध्ये शनिवारी (दि. ६) वितरित करण्यात आली.
यावेळी चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डाॅ. गोपाल मुंधडा, जिल्हा क्षयरोग अधिकारी डाॅ. ललित पटले, अमोल जगताप, महिला संस्कार कलश योजनेच्या अध्यक्ष उषा बुक्कावार, प्रकल्प निर्देशिका अंजली बिरेवार, माधुरी नार्लावर, कलशच्या पदाधिकारी व सर्व सदस्य उपस्थित होते. आयुक्त पालिवाल यांनी महिला कलशसारख्या सेवाभावी संस्थांची आरोग्य क्षेत्राला गरज असल्याचे सांगितले. डाॅ. मुंधडा यांनीही आरोग्य उपक्रमाचे कौतुक केले.
क्षयरोगमुक्त भारताची संकल्पना समोर ठेवून ‘प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान’ जिल्ह्यात सुरू आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डाॅ. पटले यांनी दिली. जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, औद्योगिक संस्था, सामाजिक संस्थांनी निक्षय मित्र होऊन क्षयरुग्णांना सहकार्य करावे, असे आवाहन केले. महिला संस्कार कलश योजनेच्या भगिनींनी या आवाहनाला प्रतिसाद देऊन जिल्ह्यातील २५ रुग्णांना प्रोटीन डाएट देण्याची जबाबदारी स्वत:कडे घेतली. अंजली बिरेवार यांनी सूत्रसंचालन केले.
उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या मैत्रिणींचा सत्कार :
क्षयरुग्णांना तांदूळ, तूरडाळ, तेल, शेंगदाणा, चिक्की, फुटाणे, सोयाचिक्स व खजूर देण्यात आला. शिवाय, गीता पाऊणकर यांनी संस्कार कलशला पाच हजारांची मदत दिली होती. त्यातून रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. एक लाखाच्या निधीतून क्षयग्रस्त रुग्णांना प्रोटीन डाएट देण्यात येणार आहे. या उपक्रमाला आर्थिक सहकार्य करणाऱ्या मैत्रिणींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
‘लोकमत’ने दिली प्रेरणा :
‘लोकमत’ने ६ डिसेंबर २०२३ रोजी ‘टीबीवर उपचार मिळतोय; पण पोषण आहाराचे काय’ या मथळ्याखाली लक्षवेधी वृत्त प्रकाशित केले होते. जिल्ह्यातील २५८८ रुग्णांपैकी केवळ ५८१ टीबी रुग्णांना दात्यांकडून पोषण किट मिळत असल्याचे वृत्तात म्हटले होते. त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार काही रुग्णांची जबाबदारी घ्यावी, हा विचार मनात आला. मैत्रिणींना सांगितल्यानंतर त्यांना उपक्रमाचे महत्त्व कळले. अन्य संघटनांनीही टीबी रुग्णांना अशी मदत करावी, असे आवाहन महिला संस्कार कलश योजनेच्या अध्यक्ष उषा बुक्कावार यांनी केले.