पंचायत समिती सभापती व उपसभापती : घरभाडे व मानधनावरही लाखोंचा खर्च चंद्रपूर : पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाकडून जनहिताच्या विविध योजना राबविल्या जात आहे. यासाठी शासनाकडून लाखोंचा निधी मिळत असते. मात्र पंचायत समिती सभापती व उपसभापतींच्या प्रवास भत्त्यावर तसेच मानधन, घरभाडे व इतर खर्चावरच अर्धा अधिक निधी खर्च होत असल्याची बाब जिल्हा परिषदेच्या वार्षिक अहवालातून समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या वार्षिक अहवालानुसार जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतींसाठी प्रवास भत्त्याच्या स्वरूपात २०१४-१५ या वर्षात ९ लाख ६ हजार ८८१ रूपयांचा खर्च झाला आहे. तर घरभाडे व इतर खर्चाच्या स्वरूपात २ लाख ९५ हजार ८०५ रूपये तसेच मानधनासाठी ३१ लाख ६६ हजार ९३९ रूपये खर्च झाले आहे, असे नमुद आहे. पंचायत समिती सभापतीसाठी निवासस्थान व वाहन असते. तर उपसभापतीलाही काही सुविधा दिलेल्या आहेत. मात्र याव्यतीरिक्तही प्रवास भत्त्याच्या स्वरूपात दरवर्षी ९ ते १० लाख रूपये खर्च करण्याची वेळ प्रशासनावर येत आहे. त्यामुळे शासनाकडून मिळालेल्या निधीतून किंवा पंचायत समितीच्या मिळणाऱ्या निधीतून हा खर्च केला जात असल्याने विकास कामांवर निश्चीतच परिणाम पडत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
अबब! प्रवास भत्त्यावर १० लाखांचा खर्च
By admin | Published: February 23, 2016 12:32 AM