राजुरा : कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे राज्यातील शाळा व महाविद्यालये १५ मार्च २०२० पासून बंद करण्यात आली होती. मागील वर्षी जवळपास शैक्षणिक वर्ष पूर्ण होत आले असल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पास करण्यात आले. परंतु शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये जवळपास १५ ते २० टक्के विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी संपूर्ण वर्षभर ऑनलाइन किंवा ऑफलाइन शिक्षण घेतलेले नाही, अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णय ईसा संघटनेच्या सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी घेतला आहे.
१५ ते २० टक्के विद्यार्थी किंवा पालक शालेय व्यवस्थापनाच्या संपर्कातही नाहीत. कोरोनामुळे त्यांनी स्थलांतरही केले असू शकते. अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देणे म्हणजे त्यांचे शैक्षणिक नुकसान केल्यासारखे होईल. कारण त्यांनी वर्षभर या वर्षाचा कोणत्याही प्रकारचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भविष्यात शैक्षणिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्याचे हित लक्षात घेऊन ईसा संघटनेच्या सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी असा निर्णय घेतला आहे की जे विद्यार्थी वर्षभर ऑनलाइन किंवा ऑफलाइन शिक्षणासाठी सतत गैरहजर होते. त्यांना पुढील वर्गाकरिता प्रवेश देण्यात येणार नाही. जिल्ह्यात बऱ्याच इंग्रजी माध्यमाच्या शाळा या निर्णयाची अंमलबजावणी करणार आहेत.