जयंत जेनेकर
कोरपना : माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी, आदिवासीबहुल, अतिदुर्गम गाव म्हणून परिचित असलेल्या कोरपना तालुक्यातील मांगलहिरा येथे पाण्याअभावी दरवर्षी टंचाई जाणवायची. परंतु यंदा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारे खोदण्यात आलेल्या विहिरीच्या माध्यमातून मुबलक पाण्याचे स्रोत गावकऱ्यांना उपलब्ध झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.
या विहिरीवरून गावातील नळ योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक घरात मुबलक पाण्याची सोय निर्माण झाली आहे. यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण थांबली आहे. शासनाच्या माध्यमातून या गावात पाणी पोहोचविण्याकरिता अनेकदा नळ योजनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले. परंतु मुबलक पाण्याच्या स्रोताअभावी दरवेळेस टंचाई निर्माण व्हायची. आता स्रोत गवसल्याने गावकऱ्यांची मोठी अडचण दूर झाली आहे. यामुळे महिला व नागरिकांची होणारी पाण्यासाठीची कसरत थांबली गेली आहे.