चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा प्रवेशद्वार परिसरातीळ जंगल क्षेत्रात जमिनीवर अतिक्रमण केलेल्या लोकांच्या जिप्सी ताडोबा प्रशासनानं आज अचानक अडवून ठेवल्यानं पर्यटकांत एकच गोंधळ उडाला.
ताडोबाच्या कोलारा प्रवेशद्वारावर हा सगळा प्रकार सकाळी सहा वाजता सुरू झाला. जंगल प्रवेशबंदी केल्यानं सर्व जिप्सीमालकांनी गेटवर ठिय्या आंदोलन करुन इतर जिप्सीनांही रोखून धरले. जिप्सी मालक आणि वन विभागाच्या या वादात पर्यटक भरडले जाऊ नये, म्हणून शेवटी साडेसात वाजताच्या सुमारास या सर्व जिप्सी ताडोबात सोडण्यात आल्या. दुपारी वनाधिकारी चर्चेसाठी येणार असल्याचे सांगण्यात आले.
ताडोबा जंगलातील कोलारा परिसरातील वनजमीनीवर काही जणांनी अतिक्रमण केले आहे. यातील आठ जणांच्या जिप्सी गाड्या असून, पर्यटनाच्या माध्यमातून ते पैसेही कमवत आहेत. वनजमिनीवर अतिक्रमण करणं, हा गुन्हा आहे. त्यामुळं या लोकांनी आधी अतिक्रमण सोडावं आणि नंतर जिप्सी चालवावी, अशी भूमिका ताडोबा प्रशासनानं घेतली. त्यामुळं आज ही मोहीम ताडोबा प्रशासनानं सुरू केली.
वन गुन्ह्यात अडकलेल्या लोकांना ताडोबाचा कोणताही फायदा मिळता कामा नये. ज्या-ज्या लोकांवर असे वन गुन्हे आहेत, त्यांचा आता शोध घेऊन त्यांना ताडोबाच्या लाभापासून दूर ठेवण्याचा निर्णय ताडोबा प्रशासनानं घेतलाय. यासंदर्भात दुपारी बैठक बोलावण्यात आली आहे. दरम्यान, या कारवाईमुळे जिप्सी मालकांनी व पर्यटकांनी गेटवर गोंधळ घातल्यानं साडेसात वाजताच्या सुमारास सर्व जिप्सी सोडण्यात आल्या.