एखाद्या विद्यार्थ्याचा अपघाताने मृत्यू झाल्यास शासनाने अशा विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू केली आहे. या आर्थिक वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात अशा २५ पालकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. ७५ हजार रुपये धनादेशाद्वारे देण्याचे या योजनेत प्रावधान आहे.
माहितीनुसार नागभीड तालुक्यात २, भद्रावती २, सावली ५ , ब्रम्हपुरी २ , कोरपना १, चिमूर ४, चंद्रपूर १, मूल १, सिंदेवाही १, राजुरा २, बल्लारपूर २ आणि गोंडपिपरी २ असे तालुकानिहाय अपघातात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण आहे. नागभीड येथील लाभार्थ्यांच्या पालकांना सोमवारी या धनादेशाचे वितरण पंचायत समितीचे सभापती प्रफुल्ल खापर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभारी गट शिक्षण अधिकारी प्रमोद नाट, प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी परमानंद बांगरे, नगरसेवक प्रतीक भसीन यांची उपस्थिती होती.