तीन अपघात : दोन ठार, तीन गंभीरचंद्रपूर : शुक्रवारचा दिवस अपघातवार ठरला. घुग्घुस येथे रात्री ७.४५ वाजता झालेल्या विचित्र अपघातात चंद्रपूरचे नगरसेवक देवीदास गेडाम ठार झाले तर पत्नी गंभीर झाली. चिमूर-कानपा मार्गावर रात्री ७.३० वाजता झालेल्या अपघात एक ठार व एक गंभीर आणि पोंभुर्णा येथे सायंकाळी ६ वाजता चारचाकी वाहनाच्या धडकेत दोन गंभीर जखमी झाले आहेत.चंद्रपूर येथील नगरसेवक देविदास बाबुराव गेडाम आपल्या पत्नीसह घुग्घुसकडून चंद्रपूरकडे दुचाकी क्र. एमएच ३४ एव्ही ३६२९ ने रात्री ७.४५ वाजता येत असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरूस्त ट्रकला (एमएच ३४ ए ३८००) दुचाकीची धडक बसली. दुचाकी सरळ नादुरूस्त ट्रकच्या आत शिरली. त्यात गेडाम यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी असून त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.शंकरपूर येथे अपघातचिमूर-कानपा मार्गावर टाटा सुमो क्र. एमएच २१ बी ६७२ प्रवासी घेऊन कानपाकडे जात असताना कानपाकडून हिरापूरला जाणाऱ्या दुचाकीला (एमएच ३६ डी ३०६२) जावून आदळली. शंकरपूर येथील महावितरण कार्यालयाजवळ हा अपघात घडला. यात दुचाकीवर मागे बसलेला राजू आष्टणकर (२८) याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक राहुल बावनकर (२७) गंभीर जखमी आहे. त्याला पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे. पोंभुर्णा येथे दोन जखमी काही विद्यार्थी इयत्ता बारावीची लेखी परीक्षा देण्याकरिता शुक्रवारी पोंभुर्णा येथे आले होते. ते पेपर सोडविल्यानंतर मूलमार्गे आपल्या गावाकडे जाताना जिल्हा सहकारी बँकेजवळ वाहनावरील नियंत्रण सुटले. यात चारचाकी वाहन क्र. एमएच ३४ एएम ९५७० ने वृत्तपत्र विक्रेता अशोक बोलीवार (४७) रा. पोंभुर्णा व सुधाकर ठाकरे (५५) रा. पोंभुर्णा या दोघांना जोरदार धडक बसली. जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. जखमींची अवस्था गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेचा तपास पोंभुर्णा ठाणेदार निर्मला किन्नाके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (लोकमत चमू)
चंद्रपूरच्या नगरसेवकाचा अपघाती मृत्यू
By admin | Published: March 11, 2017 12:44 AM