चंद्रपूर : २२ डिसेंबर २०१३ च्या रात्री ८ वाजता दरम्यान पोलीस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत नवीन जामसाळा हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी आरोपीस न्यायालयाने बुधवारी १० वर्षाची शिक्षा सुनावली. रणजीत दुर्योधन घुटके (२३) रा. नवीन जामसाळा ता. सिंदेवाही असे आरोपीचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही रात्रीच्या सुमारास लघुशंका करण्यास गेली असता, आरोपी रणजीतने तिला पकडून अत्याचार केला. त्यानंतर घटनेची माहिती कुणालाही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. अशा फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून पोलीस ठाणे सिंदेवाही येथे कलम ३७६, ५०६ भादंवि सहकलम ४ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा सन २०१२ अन्वये गुन्ह्याचे नोंद करण्यात आली. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक डी. एम. अलोने यांनी पूर्ण करून आरोपी विरुद्ध न्यायालयात आरोपपत्र सादर केले.न्यायालयाचे सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात न्यायालयाने अनेक साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याचे आधारे २५ नोव्हेंबर रोजी आरोपी रणजीत दुर्योधन घुटके रा. नवीन जामसाळा याला भादंवि कलम ३७६ मध्ये दहा वर्षे शिक्षा व दोन हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा, दंड न भरल्यास एक महिना शिक्षा चंद्रपूरचे जिल्हा सत्र न्यायाधीश-१ के. के. गौर यांनी सुनावली. या प्रकरणामध्ये सरकारतर्फे अॅड. संजय मुनघाटे, सरकारी उपभोक्ता चंद्रपूर यांनी काम पाहिले. आरोपीची तुरूंगात रवानगी करण्यात आली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
अत्याचार करणाऱ्या आरोपीस शिक्षा
By admin | Published: November 28, 2015 2:08 AM