नागभीड : प्रकरण निरस्त झाले असतानाही परत त्याच प्रकरणासंदर्भात येथील काही नागरिकांना समन्स बजावण्यात आल्याने येथे एकच खळबळ उडाली आहे. पोलीस विभागाच्या या धोरणाबद्दल संतापही व्यक्त होत आहे.२००९ देशात लोकसभेची निवडणूक झाली. चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात त्यावेळी भाजपकडून अशोक नेते तर काँग्रेसकडून मारोतराव कोवासे यांनी निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत आचारसंहितेचे भंग केल्याच्या आरोपावरुन त्यावेळी येथील भाजपाचे कार्यकर्ते संजय गजपुरे, जहाँगीर कुरेशी, रवींद्र आंबोरकर, वामण तलमले यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.काही दिवस हे प्रकरण कोर्टात चालल्यानंतर यथावकाश या प्रकरणाचा निकाल लागला. या सर्वांचे निर्दोषत्व सिद्ध झाले. दरम्यान २०१५ मध्ये या तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि अचानकपणे २००९ च्या प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्या सर्व लोकांना उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावण्यात आले.हे समन्स हाती पडल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. प्रकरण निरस्त झाल्यानंतर समन्स कसे काय, यासंदर्भात त्यांनी माहिती काढली असता गेल्या १० वर्षात ज्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या सर्वांनाच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आदेशान्वये समन्स बजावण्यात आल्याची माहिती मिळाली. (तालुका प्रतिनिधी)
निरस्त प्रकरणातील आरोपींना परत नव्याने समन्स
By admin | Published: September 25, 2015 1:39 AM