चंद्रपूर : केवळ अवैध दारू विक्रीसाठी हटकले म्हणून जमिन खरेदी विक्री प्रकरणात आपल्याला गोवण्यात आले असल्याचा आरोप वरोरा तालुक्यातील बोर्डा येथील अंकूश आगलावे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.निवेदनानुसार, चालबर्डी येथील नीळकंठ दसरू उमरे याचा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय आहे. अलिकडेच त्याने त्याच्या मालकीची शेती विकली. सदर जमिन वेकोलित जाणार असून वेकोलिने ते संपादित केली असती तर त्यातून नीळकंठच्या मुलाला वेकोलित नोकरी मिळाली असती. यावरून नीळकंठ व त्याच्या मुलामध्ये वाद झाला. त्यामुळे विकलेली जमिन परत मिळविण्यासाठी मुलगा व नातवाने टाकलेल्या दबावातून नीळकंठ उपरे याने पोलिसांकडे तक्रार केली. या तक्रारीत जमिन खरेदी करणाऱ्यासह अन्य काही लोकांची नावे टाकण्यात आली. या व्यवहाराशी कोणताही संबंध नसताना वेकोलिच्या माजरी खाणीत नोकरीवर असलेल्या अंकुश आगलावे यांचेही नाव टाकण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी आगलावे यांच्याविरुद्धही गुन्हे दाखल केले. दरम्यान, गुन्हे दाखल झाल्याची माहिती आगलावे यांना मिळाल्यानंतर त्यांनी वरोरा न्यायालयातून अटकपूर्व जामिनही मिळाला. या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसताना केवळ नीळकंठ उपरे याला अवैध दारू विक्रीसाठी अनेकदा अडवणूक केल्यामुळे या प्रकरणात आपलेही नाव गोवण्यात आल्याचा आरोप अंकूश आगलावे यांनी निवेदनातून केला आहे. सध्या नीळकंठ उपरे याच्याजवळ शेती विक्रीतून आलेली मोठी रक्कम आहे. हे पैसे हडपण्यासाठी नीळकंठचा मुलगा आपल्याला सातत्याने धमक्या देत असलेल्या आगलावे यांचे म्हणणे आहे. त्याला विष पाजून मारून टाकतो आणि तुझ्या नावाने तक्रार देतो, अशा धमक्या नीळकंठचा मुलला आपल्याला देत असल्याचे अंकूश आगलावे यांनी निवेदनात नमूद केले आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
खोट्या तक्रारीवरून गुन्हे दाखल केल्याचा आरोप
By admin | Published: May 27, 2015 1:26 AM