राजुरा
:
गुप्त माहिती मिळाल्यावरून राजुरा वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांसह सुमठाणा गावातील दौलत सुरतेकर यांच्या घरी धाड टाकून बेकायदेशीर आणलेले आठ हजार ८९ रुपये किमतीचे सागवान प्रजातीचे सागवान लाकडे व इतर अवजारे जप्त करण्यात आले.
या प्रकरणात दौलत सुरतेकर यास अटक करून वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आणखी कुणी आरोपी सहभागी आहेत का, याची चौकशी करण्यात येत आहे.
मध्य चांदा वन विभागाचे राजुरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सुमठाणा नियत क्षेत्राचे कक्ष क्रमांक १५४ मध्ये सागवान झाडाची अवैध तोड झाल्याचे समजताच वनकर्मचारी त्याची चौकशी करत होते. दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट यांना गुप्त माहिती मिळताच अधिनस्त वनकर्मचारी क्षेत्र सहायक प्रकाश मत्ते, वनरक्षक मीरा राठोड, मनोज वानखेडे, संजय चौबे, वनमजूर शामराव खेडेकर,प्रभूदास धोटे यांनी सुमठाणा येथील दौलत सुरतेकर याच्या घरी धाड टाकून झडती घेतली असता बेकायदेशीररित्या सागवान झाडाचे लाकूड आढळून आले. मोका पंचनामा करून सुमारे आठ हजार ८९ रुपयांचे सागवान आणि साहित्य जप्त केले व आरोपीस अटक केली. पुढील तपास उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.