आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : दारूविक्रीच्या प्रकरणातील एका आरोपीने येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातून पोलिसांच्या तावडीतून पळ काढला. यानंतर तो थेट उच्च वीज दाबाच्या टॉवरवर चढला. अशातच त्याने जिवंत वीज तारांना स्पर्श करून आत्महत्या केली. भद्रावती येथे बुधवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने पोलीस प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे.देवकुमार ऊर्फ गोली बेडू कोराम (२४) असे मृतकाचे नाव आहे. तो चंद्रपूरच्या भिवापूर परिसरातील लालपेठ मातानगर चौकातील रहिवासी आहे. अवैध दारूविक्रेत्याने अशी टोकाची भूमिका घेतल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. वरोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवार यांनी प्रकरणाची सीआयडी चौकशी होणार असल्याचे सांगितले.जून २०१७ रोजी देवकुमारविरुद्ध दारूविक्रीचा गुन्हा नोंदविला होता. तेव्हापासून तो फरार होता. मंगळवार दि. २६ डिसेंबरला त्याला भद्रावती पोलिसांनी शिताफीने अटक केली. आज त्याला इतर गुन्ह्यातील दोन आरोपींसोबत येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर करण्याकरिता पोलीस शिपाई शाहबाज सय्यद व श्रीकांत यांनी नेले. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना आरोपी देवकुमारने इतर दोन आरोपींना आपली जमानत घ्यायला कुणीही नाही. त्यामुळे जेलमध्ये जावे लागेल, अशी खंत व्यक्त केली. यानंतर काहीवेळातच त्याने पोलिसांना चकमा देत तेथून पळ काढला. सुमारे १ कि.मी. अंतरावर तो धावत सुटला. पोलीस त्याचा पाठलाग करीत होते. चंद्रपूर-नागपूर महामार्गाच्या बाजुलाच असलेल्या कटारिया ले-आऊटमध्ये तो शिरला. तेथे लागूनच असलेल्या उच्च वीज दाबाच्या वाहिनीेच्या टॉवरवर चढला. हा प्रकार अनेकांनी बघितला. त्याला खाली उतरण्यासाठी अनेकांनी विनवणी केली असता मला जेल होईल. जेलमध्ये जायचे नाही, असा तो ओरडून सांगत होता. अशातच त्याने जिवंत विद्युत तारांना स्पर्श केला. जखमी अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ नेताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. घटनेचा प्राथमिक तपास भद्रावतीचे ठाणेदार बी. डी. मडावी हे करीत आहेत.
भद्रावतीमध्ये जिवंत विद्युत तारांना स्पर्श करून आरोपीने केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 9:40 AM
दारूविक्रीच्या प्रकरणातील एका आरोपीने येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातून पोलिसांच्या तावडीतून पळ काढला. यानंतर तो थेट उच्च वीज दाबाच्या टॉवरवर चढला. अशातच त्याने जिवंत वीज तारांना स्पर्श करून आत्महत्या केली.
ठळक मुद्देदारूविक्री प्रकरणात अटकजेलमध्ये जाण्याच्या भीतीने टोकाचे पाऊल