चंद्रपूर : मूल येथील बनावट देशी दारूचा कारखाना प्रकरणातील फरार आरोपीने उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी घडली. उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. राजू श्यामराव मडावी (२६, रा. बाबुपेठ) असे या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे, आरोपी राजू हा शरण जाण्याच्या उद्देशाने कार्यालयात गेला असल्याचे त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.
दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यात आली. यानंतर जिल्ह्यात बनावट दारूविक्री करणारे रॅकेट सक्रिय झाले. मूल तालुक्यातील चितेगाव येथील एका शेळीपालन केंद्रावर बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून अवैध दारू तयार करण्याचा कारखाना उधळून लावला. या प्रकरणात पोलिस पाटील गुरू संग्रामे आणि उमाजी झाडे या दोघांना उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. तर पवन वर्मा, अरुणा मरस्कोल्हे व राजू मडावी हे तिघे घटनेनंतर फरार झाले होते. या तिघांचा उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून शोध सुरू होता. परंतु, पंधरा दिवस उलटूनही हे तिघे हाती लागले नाहीत.
उत्पादन शूल्क विभागाने फरार आरोपींच्या शोधासाठी पथके गठीत करून तपास सुरू केला. फरार आरोपी राजू मडावी याच्या कुटुंबीयाकडे त्याच्यासंदर्भात विचारणा केली होती. त्यानंतर राजू मडावी हा स्वत: शरण जाण्यासाठी उत्पादन शूल्क विभागाच्या कार्यालयात गेला. दरम्यान मडावी याने त्या कार्यालयातील बाथरूममध्ये उंदीर मारण्याचे औषध घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.
फरार आरोपीने चक्क कार्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न केल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. राजू मडावी हा दारू पिऊन आला होता, त्याने पोलिसांसोबत वादही घातला, या प्रकरणातून आपली सुटका करण्याच्या अनुषंगाने त्यांनी नाट्य घडविले, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.