मंगेश सारंगधर कुंभारे (३८) असे आरोपीचे नाव असून तो सुमठाणा, ता. भद्रावती येथील रहिवासी आहे. मृताचे नाव विजय इंगळे होते. हे दोघेही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात कार्यरत होते, तसेच एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यांचे एकमेकांच्या घरी जाणे-येणे होते; परंतु घटनेच्या चार महिन्यांपूर्वी त्यांचे खटकले. त्यातून १३ नोव्हेंबर २०१४ रोजी कुंभारेने इंगळेचा चाकूने वार करून खून केला.
७ नोव्हेंबर २०१७ रोजी वरोरा सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. हा खून रागाच्या भरात झाला. त्यामुळे शिक्षा कमी करण्यात यावी, अशी विनंती त्याने केली होती. उच्च न्यायालयाने रेकॉर्डवरील पुरावे लक्षात घेता आरोपीचे अपील फेटाळून लावले. भांडण झाल्यानंतर इंगळे पळून गेला होता; परंतु कुंभारेने पाठलाग करून त्याला पकडले व तो मरेपर्यंत चाकूने वार केले, असे अपील फेटाळताना नमूद करण्यात आले.