चिंचोली - निंबाळा परिसरात भूगर्भातील पाण्याचे स्रोत आटल्याने पाणीटंचाईची भीषणता लक्षात घेता शासनाने दोन गावातील नागरिकांच्या सोयीसाठी मुख्य मार्गावरील गोवरी येथील एका शेतात बोअरवेल व मोटरपंप बसवून गोवरी ते निंबाळा अशी नऊ किमी अंतरावर भूमिगत पाईपलाईन टाकली. चिंचोली (खुर्द) येथे लाखो रुपये खर्च करून दोन गावासाठी पाण्याची टाकी बांधण्यात आली. मात्र शासकीय अधिकार्यांच्या दुर्लक्षाने भूमिगत पाईपलाईन जागोजागी फुटल्याने नळयोजना प्रभावित झाली आहे. लाखो रुपये खर्च करून बांधलेली पाण्याची टाकी शोभेची वास्तू ठरली आहे. राजुरा तालुक्यातील चिंचोली (खुर्द)- निंबाळा परिसरात भूगर्भातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने दहा वर्षांपूर्वी पाण्याची भीषणता लक्षात घेता शासनाने मुख्य मार्गावरील गोवरी येथील एका शेतात चिंचोली- निंबाळा येथील नळयोजनेसाठी बोअरवेल खोदण्यात आला. या नळयोजनेसाठी चिंचोली येथे लाखो रुपये खर्च करून पाण्याची टाकी बांधण्यात आली. निंबाळा गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी गोवरी ते चिंचोली आणि चिंचोली ते निंबाळा अशी नऊ कि.मी. अंतरावर भूमिगत पाईपलाईन टाकण्यात आली. या पाईपलाईनच्या कामात लाखो रुपये खर्च करण्यात आले. दुरवरुन आणलेल्या पाणीपुरवठा नळयोजनेचा शुभारंभ झाल्यानंतर सुरुवातीला पाणी नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचते. त्यामुळे गावकर्यांची पाण्यासाठी दिवसरात्र होणारी ससेहोलपट थांबल्याने गावात शासनाची योजना पोहोचल्याचा आनंद गावकर्यांना झाला. प्रारंभी ही नळयोजना सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यशस्वी झाल्यानंतर अल्प कालावधीत पाईपलाईन जागोजागी फुटली. पाईपलाईनची अनेकदा दुरुस्ती करण्यात आली. नऊ कि.मी. भूमिगत पाईपलाईनच्या लिकेजमुळे शासकीय अधिकार्यांच्या नाकीनऊ आले. चिंचोली- निंबाळा या दोन गावातील पाण्याच्या उदिष्टासाठी योजनेची बोअरवेल गोवरी येथे पाण्याची टाकी चिंचोलीला तर पाणीपुरवठा निंबाळा गावाला अशी तिहेरी अवस्था निर्माण झाली. शासकीय अधिकार्यांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने ही नळयोजना सुरळीत राबविली असती तर दोन गावातील गोरगरीब जनतेच्या घरापार्यंत पाणी पोहोचले असते. नळळोजनेचे मोटरपंप शेतात धूळखात पडले असून पाण्याची टाकी शोभेची वास्तू ठरली आहे. चिंचोली येथील अधिक माहिती घेतली असता १४२ घरगुती बोअरवेल आणि सहा सरकारी हातपंप असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले असले तरी येथील जनता नळयोजनेच्या पाण्यापासून पोरकी झाली आहे. चार वर्षांपूर्वी या गावात तापाची साथ आली होती. अख्खे गावच तापाच्या साथीत सापडल्याने अनेकांचा मृत्यूही झाला होता. गावातील फ्लोराईडयुक्त पाणी आणि गावाच्या सभोवताल असलेल्या घाणीने गावात तापाची साथ आल्याचे स्पष्ट झाले. आजही गावाच्या मुख्य रस्त्यालगत दोन्ही बाजुला शेणखताचे ढिगारे टाकण्यात येत असल्याने पावसाळ्यात साथीच्या आजाराची शक्यता बळावण्याची भीती व्यक्त केली जात असून याकडे लक्ष देण्याची मागणी गावकर्यांनी केली आहे. चिंचोली- निंबाळा पाणीपुरवठा नळयोजना लाखो रुपये खर्च करून रखडल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहे.