पीडित विद्यार्थ्यांची मागणी : आवळगाव जिल्हा परिषद शाळेतील प्रकारआवळगाव : शालेय वेळेत मद्य प्राशन करून विद्यार्थी व विद्यार्थिनींना अश्लील शिवीगाळ करुन नाहक मारहाण करणाऱ्या ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकावर कठोर कार्यवाही करुन त्यांचे तत्काळ स्थानांतरण करण्याची मागणी शाळेतील पीडित विद्यार्थी व पालकांनी संवर्ग विकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.आवळगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत गेल्या चार वर्षांपासून मुख्याध्यापक पदावर संजय भैसारे कार्यरत आहेत. ते अनेकदा शालेय वेळेत मद्य प्राशन करुन येत असल्याने स्वत:वर त्यांचे नियंत्रण राहत नाही. आवळगाव येथे ६ ते ८ जानेवारीला बिटस्तरीय क्रीडा संमेलन आयोजित करण्यात आले होते. ६ जानेवारीला रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनादरम्यान मंचावर भाषण करताना बिटातील सर्व उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांना त्यांच्या मद्यपी वृत्तीचे दर्शन झाले. मुख्याध्यापक भैसारे हे विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिवीगाळ करताना अश्लील शब्दांचा वापर करतात. एवढेच नव्हे तर विद्यार्थी व विद्यार्थिनींना नाहक मारहाण करण्याच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये दहशत पसरली आहे. मुख्याध्यापक स्वत:च कर्तव्यात कसूर करीत असल्याने काही शिक्षकांची बेबंदशाहीसुद्धा वाढली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पाच, सहा व सातव्या वर्गात शिकविणे बंद करण्यात आले आहे. अशा प्रकारांमुळे सदर मुख्याध्यापक शाळेत कार्यरत राहिल्यास शैक्षणिक वातावरण बिघडून भविष्यात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. यामुळे या प्रकरणाची चौकशी करुन मुख्याध्यापक भैसारे यांच्यावर तत्काळ स्थानांतरणाची कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी निवेदनातून केली आहे. (वार्ताहर)
मद्यपी मुख्याध्यापकावर कार्यवाही करा
By admin | Published: January 26, 2016 12:40 AM