सिंदेवाही : महाराष्ट्र शासनाने पर्यावरणाच्या हिताच्या दृष्टीने कठोर कारवाई करीत, गणेशोत्सवासाठी पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी घातलेली आहे. पीओपीच्या गणपतीची मूर्ती बनविणे व विकणे अवैध आहे, तरीही सिंदेवाही नगरपंचायत हद्दीत खुलेआम पीओपीच्या गणेशमूर्ती विकल्या जात आहेत. अशा मूर्ती विकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
पीओपीच्या मूर्ती दिसायला जास्त सुबक असल्यामुळे लोक त्याच खरेदी करतात आणि पारंपरिक मातीपासून गणपती बनविणाऱ्या मूर्तिकारांच्या मूर्ती विकल्या जात नाही. त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. सोबतच या पीओपीच्या मूर्ती पर्यावरणाच्या ऱ्हासालाही कारणीभूत असल्याने त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, यासाठी सिंदेवाही तालुका शिवसेनेचे प्रमुख देवेंद्र मंडलवार यांनी नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी मूर्तिकार संघटनेचे किशोर वरवाडे, प्रवीण वरवाडे, मुखरू वरवाडे, बंडू वरवाडे, विजय वरवाडे, दिनेश वरवाडे उपस्थित होते.