चंद्रपूर : शहरात अनेक इमारती अनधिकृत आहेत. या इमारतींविरोधात काही महिन्यांपूर्वी मनपाने मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अद्यापही तशी कार्यवाही पुढे सरकली नाही. याबाबत मनपाच्या आमसभेत नगरसेवकांनी जाब विचारला. त्यावर महापौरांनी अनधिकृत इमारतींवर एका महिन्याच्या आत कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली. महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज शुक्रवारी मनपाच्या सभागृहात पार पडली. सभेला सुरुवात होण्यापूर्वीच स्थायी समितीचे माजी सभापती नंदू नागरकर यांनी हाऊसमधील बैठक व्यवस्थेवर आपला आक्षेप नोंदविला. आजच्या आमसभेत माजी महापौर, उपमहापौर, गटनेते, तीन झोनचे सभापती यांचीही समोर बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या आसन व्यवस्थेत माजींना स्थान का देण्यात आले, असा नागरकर यांचा आक्षेप होता. यावर स्थायी समिती सभापती यांनी नव्या सभागृहात प्रोटोकालनुसार ही तजवीज करण्यात आली असल्याचे सांगितले. स्थायी समितीचे माजी सभापती यांचा कार्यकाळ एक वर्षांचा असतो. पाच वर्षात पाच सभापतींना समोर बसविणे शक्य नसल्याचेही तिवारी यांनी स्पष्ट केले.त्यानंतर आमसभेच्या अजेंड्यावर असलेल्या गोलबाजारातील थकित मालमत्ता कराचा विषय चर्चेला आला. गोलबाजारामधील व्यावसायिक पूर्वी १५० ते २०० रुपये मालमत्ता कर द्यायचे. मात्र दोन वर्षांपासून मनपाने मालमत्ता करात वाढ केली. तेव्हापासून मनपाच्या गाळ्यामधील व्यावसायिकांनी कराचा भरणा केला नाही. त्यामुळे मनपाने २४ टक्के व्याज आकारला. आजच्या आमसभेत यावर चर्चा झाल्यानंतर ५० टक्के व्याज माफ करण्याचा ठराव पारित करण्यात आला. मात्र २८ फेब्रुवारीपर्यंत थकित कराचा भरणा व्यावसायिकांनी केला नाही तर पूर्ण व्याजासह कर वसूल करण्यात येईल, अन्यथा गाळे खाली करण्याची कार्यवाही केली जाईल, असेही ठरविण्यात आले.दरम्यान, नगरसेविका सुनीता लोढिया यांनी अनधिकृत इमारतींवरील कारवाई मनपाने का थांबविली, याबाबत जाब विचारला. त्यावर महापौरांनी एक महिन्याच्या आत शहरातील अनधिकृत इमारतींवर कारवाई केली जाईल, असे सभागृहात सांगितले. (शहर प्रतिनिधी)
अनधिकृत इमारतींवर होणार कारवाई
By admin | Published: December 27, 2014 1:21 AM