लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या प्रक्रियेला १५ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. २५ नोव्हेंबरपर्यंत आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू राहणार असून, ही निवडणूक विनाअडथळा व शांततेने पार पाडण्यासाठी निवडणुकीच्या काळात लाऊडस्पीकर वापरण्यावर आयोगाने निर्बंध घातले आहेत.
यानुसार रात्री दहानंतर लाऊडस्पीकर लावल्यास कारवाई होऊ शकते. विधानसभा निवडणूक कालावधीत उमेदवारांकडून शहर तसेच ग्रामीण भागातही स्पीकरद्वारे प्रचार यंत्रणा राबविली जाते. याच अनुषंगाने निवडणूक आयोगाने काही निर्बंध लागू केले आहेत. यानुसार जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या हद्दीत कोणत्याही वाहनावर ध्वनिक्षेपक बसवून त्याचा वापर फक्त सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत तोही संबंधित पोलिस ठाण्याचे अधिकारी यांची रितसर परवानगी घेऊनच करता येणार आहे. शिवाय, असा वापर करत असताना वाहन चालू ठेवून ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. सर्व प्रकारच्या ध्वनिक्षेपकांच्या वापरास वाहनावर बसवून किंवा अन्यप्रकारे दररोज सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत परवानगी राहील. सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, निवडणुकीचे उमेदवार किंवा ध्वनिक्षेपकाचा वापर वाहनावर बसवून किंवा प्रचार करणाऱ्या लोकांनी ध्वनिक्षेपकाच्या वापराचे परवानगी विवरण मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी व जवळच्या पोलिस ठाण्याला देणे बंधनकारक राहील.
जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्र जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्र आहेत. यामध्ये चंद्रपूर, राजुरा, वरोरा, ब्रह्मपुरी, चिमूर, बल्लारपूर विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. या विधानसभा क्षेत्रांमध्ये प्रचार करताना उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनाही काळजी घ्यावी लागणार आहे.
२५ नोव्हेंबरपर्यंत राहणार निर्बंध या आदेशाचा कोणीही कोणत्याही प्रकारे भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल. हा आदेश १५ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघांच्या हद्दीत २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अमलात राहणार आहे
कारवाही होणार रात्री दहानंतर लाऊडस्पीकर लावल्यास संबंधितांवर कारवार्ड होणार आहे. यासाठी पोलिस प्रशासन लक्ष ठेवून राहणार आहे. तक्रारीची वाट न बघता थेट ते कारवाई करणार आहे. त्यामुळे लाऊडस्पीकर लावताना योग्य काळजी घेणे गरजचे आहे.