नागभीड : सामान घेण्याच्या बहाण्याने दुकानात प्रवेश करून आणि दुकानदारास सामान देण्यात गुंतवून ठेवून दुकानातील रोख रकमेची चोरी करणारी टोळी नागभीड येथे सक्रिय आहे. या टोळीपासून सावधानता बाळगण्याची सूचना नागभीड पोलिसांनी केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. नागभीड येथेही चोरीची अशीच एक घटना घडली आहे. नागभीड येथे घडलेल्या घटनेचे वैशिष्ट्य म्हणजे चोरांच्या टोळीतील महिलेने अगोदर एका दुकानात प्रवेश करून दुकानदारास सामानाची मागणी केली. दुकानदार सामान देण्यात व्यस्त होताच इतर दोघांनी दुकानात प्रवेश केला व दुकानातील ड्राॅव्हरमधून रोख रक्कम लंपास केली. संबंधित महिला सामान घेऊन गेल्यानंतर चोरीची ही बाब दुकानदाराच्या निदर्शनास आली. त्यांनी लगेच नागभीड पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली.
उल्लेखनीय बाब अशी की, गर्दी नसलेल्या व एकटाच दुकानदार असलेल्या दुकानाची ही टोळी चोरीसाठी निवड करते. या टोळीत दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असतो, असा पोलिसांचा अंदाज आहे. नागरिक व दुकानदारांनी अशा टोळीपासून सतर्क राहावे, असे आवाहन नागभीड पोलिसांनी केले आहे.