वरोरा : बारावी विज्ञान शाखेत शिकत असताना अनेक व्यसने जडली. महाविद्यालयात अदा करण्याकरिता पालकांनी दिलेली शुल्क व्यसनामध्ये खर्च केली. ही रक्कम मिळविण्याकरिता स्वत:च्या महाविद्यालयातील स्नेहसंमेलनाच्या दिवशी आपल्या सहकाऱ्यासह संगणकाची चोरी केली. ही बाब उजेडात आली. परंतु, पकडल्या न गेल्याने त्यांनी पुन्हा एका जिल्हा परिषद शाळेत संगणकाची चोरी केली. या संगणकाची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असतानाच या अल्पवयीन टोळीस वरोरा पोलिसांच्या डीबी पथकाने गजाआड केले. वरोरा शहरालगतच्या आनंदवन परिसरात अनेक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालये आहेत. यामध्ये बहुतांश ठिकाणी रात्री चौकीदार ठेवण्यात आलेले नाही. बारावीच्या विज्ञान शाखेत असलेल्या अनेक मुलांना वाईट प्रवृत्तीच्या मुलांच्या सहवासात अल्पवयीन वयातच नाही ते व्यसन जडले. या अल्पवयीन टोळक्यांना आपले व्यसन पुर्ण करण्यासाठी पैसे अपुरे पडल्याने प्रारंभी परीक्षा शुल्क, कनिष्ठ महाविद्यालयाचे शुल्क, शिकवणीचे शुल्क, वह्या बुकांकरीता मिळालेल्या पैशातून मोजमस्ती सुरु केली. कनिष्ठ महाविद्यालयाचे शुल्क भरण्यासाठी घरून पैसे घेतले मात्र ते शुल्क अदा केले नाही. ही बाब महाविद्यालयाकडून घरी माहित होणार, त्यामुळे शुल्क उभे करण्याकरिता आपल्याच कनिष्ठ महाविद्यालयात स्नेहसंमेलनाच्या दिवशी आपल्या सहकाऱ्यांसह प्रोजेक्टर संगणक चोरुन नेले. याबाबत पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, कित्येक दिवसांचा कालावधी लोटूनही आम्हाला चोरीबाबत विचारणा झाली नसल्याने आणखी हिमंत करून नजीकच्या एका प्राथमिक शाळेच्या खिडकीचे गज कापून संगणक प्रोजेक्टर लंपास केले. चोरीचे काही साहित्य नादुरुस्त होते. ते दुरुस्त करुन विकण्याच्या हालचाली या टोळीकडून सुरु असताना वरोरा पोलिसांच्या डीबी पथकाने टोळक्यास ताब्यात घेतले. यावेळी पालकांना पाचारण केले असता, पालकांनी आपला पाल्य असा नव्हता, ही भूमिका घेत दुसऱ्यावर खापर फोडण्याचे काम केले. या अल्पवयीन टोळीतील मुले चांगल्या घरातील असून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याने त्यांच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे या घटनेतून स्पिष्ट झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)
व्यसनासाठी !!! अल्पवयीन मुलांच्या टोळीने चोरले शाळेतील संगणक
By admin | Published: February 23, 2016 12:38 AM