साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : काही दिवसांपूर्वी नवीन मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. यामध्ये जिल्ह्यात तब्बल ४७ हजार ६५६ मतदारांनी नावनोंदणी केली आहे. यामध्ये सर्वाधिक १५ हजार ९४३ मतदार चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात तर सर्वात कमी नोंदणी चिमूर विधानसभा क्षेत्रात झाली आहे. यामध्ये ११ हजार ३६५ मतदारांचे नाव वगळण्यात आले आहे.भारत निवडणूक आयोग व राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेतला होता. त्यानुसार १ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान मतदारांनी नावनोंदणी केली. यासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी कामाला लागले होते. गावागावात जनजागृती करून नवीन मतदारांची नावनोंदणी करून घेतली.जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्र आहे. या सर्वच क्षेत्रांत ऑनलाइन तसेच ऑफलाइन नोंदणीची व्यवस्था करण्यात आली होती. १ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे पूर्ण होत असलेल्या एकूण ४७ हजार ६५६ नवमतदारांनी नावनोंदणी केली आहे, तर ११ हजार ३६५ मतदारांचे नाव यादीतून वगळण्यात आले आहे. या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत मृत मतदार आणि कायम स्थलांतरित मतदारांच्या नावांची, लग्ने होऊन बाहेर गेलेल्या महिलांची वगळणी तसेच लग्न होऊन गावात आलेल्या महिलांच्या नावांची नोंदणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात सहा नगरपंचायतीची निवडणूक आहे. मात्र १८ वर्ष पूर्ण न झालेल्यांना वंचित रहावे लागणार आहे.
ऑनलाईनचा आधार- मतदार नोंदणी अभियान सुरू असताना जिल्ह्यात ९ हजार २२९ जणांनी ऑनलाइन मतदार नोंदणी अर्ज भरला आहे. - यामध्ये सर्वाधिक ३ हजार ४९१ चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील तरुणांनी ऑनलाइनचा आधार घेतला आहे. - राजुरा क्षेत्रातील ६९०, बल्लारपूर ३०३१, ब्रह्मपुरी ४१२, चिमूर ५६०, वरोरा १ हजार ४५ जणांनी ऑनलाइन अर्ज भरला आहे