लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळाव्यात, उपचारासाठी वारंवार चंद्रपुरात जावे लागू नये, यासाठी सिंदेवाहीत २५ कोटींचे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले. पुढील दोन महिन्यांत बांधकामाला सुरुवात होईल, अशी ग्वाही पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र वाटप करताना ते बोलत होते.यावेळी माजी आमदार नामदेव उसेंडी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संदीप गड्डमवार, जि. प. सदस्य रमाकांत लोधे, नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, नगरसेवक सुनील उट्टलवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन झाडे, प्रकाश देवतळे उपस्थित होते.पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, केंद्र शासनातर्फे सिंदेवाही येथे २० बेडच्या कोविड सेंटरला मान्यता मिळाली. त्याचेही बांधकाम सुरू होईल. दिव्यांग व्यक्तींची स्थानिक स्तरावर तपासणी करून प्रमाणपत्रासाठी शिबिर घेण्याच्या सूचना केल्या होत्या. यापूर्वी प्रमाणपत्रासाठी चंद्रपुरात जावे लागत होते. सिंदेवाही येथील शिवाजी चौकात छत्रपतींचा अश्वारुढ पुतळा उभारून चौकाचे सौंदर्यीकरण करू. क्राँक्रिटकरण, पथदिवे व फूटपाथ निर्मिती केली जाईल. पाथरी-हिरापूर रस्त्यासाठी २५० कोटी मंजूर झाल्याची माहितीही दिली.
‘त्या’ लेकींना माणुसकीची सावली- लोंढोली येथील मोफत नेत्र तपासणी शिबिराप्रसंगी गावकऱ्यांनी स्वागताची जय्यत तयारी केली. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे आगमन होताच रणरणत्या उन्हात काळ्या डांबरी रस्त्यावर शाळकरी मुली लेझिम वाजवून स्वागत करीत असल्याचे दृश्य दिसले. पालकमंत्र्यांना लगेच स्वागताचा कार्यक्रम मध्येच आटोपता घेतला. सर्व मुली कष्टकरी बापांच्या लेकी असल्याची माहिती होताच पालकमंत्र्यांनी पथकातील १४ मुलींना चप्पल घेण्यासाठी सात हजार रुपये भेट म्हणून दिले.