दिलीप मेश्राम
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील रत्नापूर (ता. सिंदेवाही) या लहानशा गावात शेताच्या बांधावर क्रिकेट खेळणारा आदिनाथ अविनाश लोधे हा थेट दुबईत आपल्या अंगी असलेल्या क्रिकेटची चुणूक दाखविणार आहे. आदिनाथची युथ टॅलेंट स्पाेर्टस् असोसिएशनने इंडियन नॅशनल कार्पाेरेट लिगसाठी भारतीय संघात त्याची निवड केली आहे. दुबईत पाच एकदिवसीय सामने व तीन टी २० सामन्यांसाठी भारतीय संघाचा भाग असणार आहे, असे आयएनसीएलने आदिनाथला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
आदिनाथला त्याच्या कामगिरीच्या आधारे आठ हजार रुपयांचे प्रायोजकत्व मिळाले आहे. शिवाय त्याने दुबईत उत्तम कामगिरी केली तर धावा आणि विकेट्सनुसारही त्यांना आर्थिक मोबदला मिळणार आहे. इतकेच नव्हे, आयएनसीएलचा गोल्ड कप, मेहमान नवाझी ट्राॅफी आणि बेटी बचाओ टी२० ट्राॅफी खेळता येणार आहे. यासाठी त्याला कोणतीही किमत मोजावी लागणार नाही. उलट त्याला लिलावात मिळालेली रक्कम मिळणार आहे. या अनुषंगानेच ही निवड करण्यात आल्याचे आयएनसीएलने निवड पत्रात स्पष्ट केले आहे.
रत्नापूर हे आठ हजार लोकसंख्येचे गाव. गावात शेतकरी व शेतमजूर वास्तव्यास आहेत. शेतीवरच येथील कुटुंबे उदरनिर्वाह करतात. येथील एका शेतकऱ्याचा मुलगा आदिनाथ लोधे यांनी क्रिकेट या खेळात कौशल्य दाखवत उंच भरारी घेतल्याने गावकऱ्यांचा उर अभिमानाने फुलला आहे.
गावामध्ये कधीकाळी शेतातील बांधामध्ये क्रिकेटचे टुर्नामेंट भरविले जायचे. ते पाहून त्या खेळाबद्दल आवड निर्माण झाली. आणि बांधांमधून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याचेच फलित दुबई येथे होणाऱ्या संघात निवड झाली. त्यामुळे परिश्रमाचे फलित झाल्याचे समाधान आहे. यामध्ये आई वडील व परिवाराचे सहकार्य आहे.
- आदिनाथ अविनाश लोधे, क्रिकेट खेळाडू, रत्नापूर, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर.