लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : कोरपना येथील भाऊराव पा. चटप आदिवासी आश्रमशाळा व संगीता चटप उच्च माध्यमिक विद्यालयाच्या १५० मीटर परिसरातील जमीन पेट्रोल पंपासाठी देण्याच्या प्रस्तावाला ३४ गावांतील आदिवासींनी कडाडून विरोध केला आहे. ही जमीन कोणत्याही परिस्थितीत अकृषक करू नये, असा आक्षेप पालकांसह ग्रामस्थांनीही चंद्रपूर जिल्हा आदिवासी संघटनेच्या नेतृत्त्वात सोमवारी जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेऊन आक्षेप नोंदविला.
भाऊराव पा. चटप आदिवासी आश्रमशाळा व संगीता चटप उच्च माध्यमिक विद्यालयात कोरपना तालुक्यातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेच्या १५० मीटर परिसरात सर्व्हे क्र. ३०/४/७/१ आराजी ०.३५ हेक्टर आर. जमीन पेट्रोल पंपाच्या प्रयोजनासाठी अकृषक करण्याची कार्यवाही सुरू आहे.
आदिवासींची मुले आता शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत. स्व. भाऊराव पा. चटप आश्रमशाळा सर्वांत मोठी व सुविधाजनक असून, आदिवासी समाजाची ६०० मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत. या शाळेजवळ पेट्रोलंपप सुरू झाल्यास मुलांच्या शिक्षणावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ही जागा पेट्रोल पंपासाठी देणे म्हणजे आदिवासींच्या मुलांवर अन्याय करण्यासारखे आहे. निवासी शाळा, वसतिगृह हे सार्वजनिक ठिकाण आहे. या परिसरात कोणत्याही परिस्थितीत पेट्रोल पंपाला परवानगी देऊ नये, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा आदिवासी संघटनेने केली आहे. यावेळी संजय सोयाम, गजानन जुमनाके, लक्ष्मण पंधरे, कृष्णा मसराम, विलास मडावी, जितेश कुळमेथे आदी उपस्थित होते.
पेट्रोप पंपावर आक्षेप घेणारी गावेकोरपना, कुकुडबोडी, शिवापूर, दुर्गाडी, कोठोडा, पांडवगुडा, मांडवा, र्यरगव्हाण, चनई, खडकी, बोरगाव, कन्हाळगाव, मांडवा, जांभुलधरा, कढोली, नारंडा, वडगाव, रामपूर, बेलगाव, इंजापूर, गडचांदूर, निजामगोंदी, खिर्डी, सोनुर्ली, वनसडी, जेवरा, सावलहिरा, यैरगाव, धानोली, कुसळ, पिपर्डा, चिंचोली येथील पालकांनी आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी प्रस्तावित पेट्रोल पंपाला विरोध केला आहे.