आॅनलाईन लोकमतभद्रावती : पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी भरणाऱ्या ताडोबा देवाच्या यात्रेस तसेच धार्मिक पुजेसाठी ताडोबा अभयारण्याच्या परिसरातील आठ गावांचे शेकडो आदिवासीबांधव रविवारी काटेझरी मार्गे ताडोबा देवाच्या दर्शनस्थळी दाखल होणार आहेत. हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या या पारंपरिक देवीच्या दर्शनाची माहिती प्रशासनाला असावी, या हेतूने निवेदनही देण्यात आले आहे.ताडोबा अंधारी प्रकल्पातील ताडोबा तलवाशेजारील ‘ताडोबा’ देवाची मूर्ती स्थापन करण्यात आली. हजारो वर्षांपासून पौष महिण्याच्या प्रत्येक रविवारी यात्रा भरत होती. शासनाने या भागाला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिल्यानंतर यात्रेवर बंदी घालण्यात आली. ताडोबा देव हा आदिवासी समाजाचे आराध्य दैवत आहे. संविधानात कुठल्याही समाजाच्या पारंपरिक देवाच्या दर्शनासाठी बंदी घालण्याची तरतूद नाही. परंतु, आदिवासी हा समाज निरक्षर आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर असल्याने शासनाने ताडोबा देवाच्या दर्शनास बंदी घातल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते माधव जीवतोडे यांनी व्यक्त केले. मागील वर्षी शंभर ते सव्वाशे आदिवासी बांधवांनी वनविभागाला माहिती देऊन दर्शन घेण्याचे ठरविले. वनविभागाने स्वत:च्या वाहनांतून देवीचे दर्शन घडविले होते. यावेळी वडेगाव, चंदनखेडा, कोंडेगाव, काटवल, घोसरी, खुटवडा, वायगाव आणि पिर्ली आदी गावांतील शेकडो आदिवासी रविवारी सकाळी नऊ वाजता काटेझरी मार्गे ताडोबा देवाच्या दर्शनासाठी पायदळ निघणार आहेत, अशी माहिती माधव जीवतोडे, सुधीर मुडेवार, वसंता दडमल, राजू गजभे, सुधाकर रंधे, विठ्ठल मडावी, अरविंद गजभे, वसंता पिंपळकर, शारदा गजभे, बेबीनंदा बावणे, वनिता जांभुळे आदींनी निवेदनातून दिली आहे.
आदिवासी घेणार ताडोबा देवाचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:17 AM
पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी भरणाऱ्या ताडोबा देवाच्या यात्रेस तसेच धार्मिक पुजेसाठी ताडोबा अभयारण्याच्या परिसरातील आठ गावांचे शेकडो आदिवासीबांधव रविवारी काटेझरी मार्गे ताडोबा देवाच्या दर्शनस्थळी दाखल होणार आहेत.
ठळक मुद्देप्रशासनाला निवेदन : पारंपरिक दर्शनासाठी आठ गावांत तयारी