लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील गुळगाव (वडगाव) येथे १५ मे रोजी होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह जिल्हा प्रशासनाने रोखला. चाईल्ड लाईन व जिल्हा बाल संरक्षण कक्षाने मुलीच्या आईवडीलांचे समुपदेशन करून बालविवाह करून दिल्याने होणाऱ्या शिक्षेची माहिती दिली. त्यामुळे आई-वडीलांनी नियोजित विवाह मोडून मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न करून देणार नाही, अशी हमी दिली.गुळगाव येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती चाईल्ड लाईनच्या १०९८ या टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाली. या माहितीच्या आधारे चाईल्ड लाईन व जिल्हा बाल संरक्षण कक्षाने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना माहिती दिली. तेव्हा बालविवाह रोखण्याची कारवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.त्यामुळे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास के. मरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाल विवाह रोखण्यासाठी त्याच कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशन, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी यांना विवाहाची माहिती देण्यात आली.घटनास्थळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, चाईल्ड लाईन केंद्राचे समन्वयक राजेश भिवदरे, सहायक पोलीस निरीक्षक सदाशिव ढाकणे, बालविकास प्रकल्प अधिकारी मयुरी पुणे, समुपदेशक ज्योती चौधरी, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सामाजिक कार्यकर्ता चंद्रप्रकाश पिंपळकर, जयसेन कसारे, शुभम कायल, चाईल्ड लाईनचे टिम सदस्य, मनोज पाटील, कल्पना फुलझेले आदी दाखल झाले.अल्पवयीन बालिकेच्या घरी भेट देऊन बालिकेच्या आई-वडीलांना होत असलेला विवाह हा बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार कायद्याने गुन्हा आहे. हा विवाह झाल्यास होणारी शिक्षा व दंडाची माहिती दिली. तसेच समुपदेशन व मार्गदर्शन केले. त्यामुळे बालिकेच्या पालकासह इतर नातेवाईकांनी बाल विवाह थांबविण्यास सहमती दर्शवून बालिकेला १८ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय विवाह करून देणार नाही, याची हमी दिली.जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्यास कोणत्याही नागरिकानी ग्राम, तालुका, जिल्हा बाल संरक्षण समिती तसेच चाईल्ड लाईनच्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
प्रशासनाने रोखला बालविवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 11:23 PM
भद्रावती तालुक्यातील गुळगाव (वडगाव) येथे १५ मे रोजी होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह जिल्हा प्रशासनाने रोखला. चाईल्ड लाईन व जिल्हा बाल संरक्षण कक्षाने मुलीच्या आईवडीलांचे समुपदेशन करून बालविवाह करून दिल्याने होणाऱ्या शिक्षेची माहिती दिली.
ठळक मुद्देवडगाव येथील प्रकार : बाल संरक्षण कक्षाची कारवाई