भद्रावती : कोविड १९ या आजाराचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्याकरिता उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाने प्रत्येक स्तरावरील लोकांची कोरोना चाचणी करणे आवश्यक केले आहे. सुपर स्प्रेडर संबंधित व्यवसायिक वर्गातील विविध नागरिकांची चाचणी होणार आहे.
भद्रावती येथे २३ फेब्रुवारीला केशकर्तनालय, ईस्त्री लॉन्ड्रीधारक दुकानदार, २४ ला किराणा दुकानदार, २५ ला भाजीविक्रेते, मटन दुकानदार, फळविक्रेते,२६ ला घरकाम धुणी-भांडी करणाऱ्या महिला, वर्तमानपत्रे वाटणारी व्यक्ती ,२७ ला हॉटेलमधील वेटर,उपहारगृहधारक,पानठेलाधारक, ०१ मार्चला खासगी वाहनचालक, ऑटोचालक, हमाल, कामगार व इतर, ०२ मार्चला कॅटरर्स कामगार, खानावळधारक ,०३ मार्चला सफाई कामगार व ग्रामपंचायत इत्यादींची कोविड चाचणी होणार आहे. तसेच कर्मचारी, इतर व्यवसायिक, दुकानदार, व्यापारी यांनी सॅनिटायझरचा वापर करणे, मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे अनिवार्य आहे. अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या अधिनियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. भद्रावती पालिकेने कारवाई सुरू केली आहे. त्यासोबतच सर्व मंगल कार्यालय व लॉनधारक यांची सभा घेऊन त्यांना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांची पायमल्ली केल्यास दंडात्मक कारवाईचे संकेतही देण्यात आले. अभियानाचा भाग म्हणून मंगळवारी शहरातील वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांची कोविड टेस्ट करण्यात आली.