नागभीड : नागभीडच्या सरपंच बेबीताई श्रीरामे आणि उपसरपंच प्रदीप तर्वेकर यांना सरपंच, उपसरपंच आणि सदस्य पदापासून अपात्र ठरविण्यात आल्यानंतर या ग्रामपंचायतीचे कामकाज चालविण्यासाठी प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी (पंचायत) आनंद नेवारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नागभीड ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात आलेल्या विविध योजनांमध्ये आर्थिक अनियमितता असल्याबाबतची तक्रार ग्रामपंचायतीचे सदस्य मो. जहाँगीर कुरेशी आणि रमेश ठाकरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी अधिकारी म्हणून ब्रह्मपुरीचे तत्कालीन संवर्ग विकास अधिकारी एन.के. सानप यांची नियुक्ती केली होती. सानप यांच्या चौकशी समितीने या ग्रामपंचायत कामाची सखोल चौकशी करून अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सरपंच-उपसरपंच तसेच ग्रामविकास अधिकारी यांनी विविध बाबीत दोषी धरून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश संवर्ग विकास अधिकाऱ्यांना दिले होते.यानंतर कुरेशी आणि ठाकरे यांनी श्रीरामे आणि तर्वेकर यांना सरपंच, उपसरपंच आणि सदस्य पदापासून अपात्र ठरवा या मागणीसाठी आयुक्ताकडे धाव घेतली. अप्पर आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. चंद्रपूर यांचे चौकशी अहवालास सहमती दर्शवून सरपंच बेबी विलास श्रीरामे आणि उपसरपंच प्रदीप गोविंदराव तर्वेकर यांना मुंबई ग्रा.पं. अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१) अन्वये अपात्र म्हणून नुकतेच घोषीत केले होते.या घोषणेनंतर या ग्रामपंचायतीचे कामकाज चालविण्यासाठी प्रशासक नियुक्त करण्याची सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी येथील संवर्ग विकास अधिकाऱ्यांना केली होती. या सुचनेनुसार संवर्ग विकास अधिकारी पी.पी. तोंडरे यांनी या ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणून आनंद नेवारे यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायतीचे काम हे प्रशासकाच्या देखरेखीत चालणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
नागभीड ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती
By admin | Published: January 14, 2015 11:05 PM