जिवती : तालुक्यातील एकूण ३६ पैकी २१ ग्रामपंचायतवर येत्या दोन आठवड्यात प्रशासक बसणार आहे. तशा आशयाचे पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्गमित केले आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) अध्यादेश २०२० अन्वये, नैसर्गिक आपत्ती किंवा आणीबाणी किंवा युद्ध किंवा वित्तीय आणीबाणी किंवा प्रशासकीय अडचणी किंवा महामारी इत्यादीमुळे राज्य निवडणूक आयोग यांच्या वेळापत्रकानुसार पंचायतीच्या निवडणुका घेणे शक्य झाले नसेल तर राज्य शासनास पंचायतीचा प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करता येईल, अशी तरतूद आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याबाबत शासन निर्णय व परिपत्रकान्वये मार्गदर्शक सूचना असून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आला आहे.
जिवती तालुक्यातील एकूण ३६ ग्रामपंचायतीपैकी २१ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ हा २०, २३, ३० जुलैला संपत आहे. या २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका घ्यायला हव्या होत्या. परंतु काही अडचणीस्तव या निवडणुका होणार नसून येथे प्रशासक नियुक्तीचे आदेश काढण्यात आले आहे. यामुळे या २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. २० जुलैला कार्यकारिणी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये शेनगाव, मारकागोंदी, भोक्सापूर, चिखली बु. आणि खडकी हिरापूर, २३ जुलैला मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये राहपली खु., पुन्नागुडा, पाटण, खडकी रायपूर आणि आंबेझरी, ३० जुलैला मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये येलापूर, मरकलमेटा, नोकेवाडा, धोंडाअर्जुनी, दमपूर मोहदा, टेकामांडवा, चिखली खु. गुडशेला, कोदेपूर, केकेझरी आणि आसापूर या ग्रामपंचायतीचा समावेश आहे आणि या सर्व ग्रामपंचायतीवर २१, २४, २८ आणि ३१ जुलैला प्रशासक नियुक्त होत आहेत.