गॅस एजन्सी नसल्याने नागरिक त्रस्त
कोरपना : कोरपना तालुक्याचे ठिकाण आहे. मात्र, अधिकृत गॅस एजन्सी नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणी येत आहे. येथे अधिकृत गॅस एजन्सी द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कोरपना येथे अधिकृत गॅस एजन्सी नसल्याने गॅस कनेक्शधारकांना ५० किलोमीटर अंतरावरील बल्लारपूरला जावे लागते.
सावली तालुक्यात ताडी विक्री जोमात
सावली : तालुक्यातील अनेक गावात सध्या ताडी विक्रीची दुकाने थाटली आहेत. तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या राज्यातून अनेक विक्रेते ताडी विकण्यासाठी सावली तालुक्यात आले आहेत. मात्र त्यांच्याकडून पावडर मिश्रित ताडी बनवून विकण्याचा गोरखधंदा सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नुकसान भरपाईची मागणी
तोहोगाव : मध्य चांदा वनविभागांतर्गत येणाऱ्या वन परिक्षेत्रातील मागील सात-आठ महिन्यापासून शेत पिकाच्या नुकसानीचे व वाघाने हल्ला करून ठार मारलेल्या गुरांचे पंचनामे करून मंजुरीसाठी सहायक नसंरक्षक यांच्याकडे पाठविण्यात आले. परंतु सात ते आठ महिने झाले. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत.
हिमायतनगर ते बुद्धगुडा रस्त्याची मागणी
जिवती : तालुक्यातील बुद्धगुडा हे गाव विविध समस्येने ग्रस्त आहे. गावात योग्य रस्ते नाही. त्यामुळे लोकांना समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे हिमायतनगर ते बुद्धगुडा हा रस्ता तयार करण्याची मागणी बुद्धगुडा गावातील नागरिकांनी केली आहे.
बंद सिग्नलमुळे वाहनधारक त्रस्त
चंद्रपूर : येथील ट्रायस्टार हॉटेल चौक, पडोली चौक, मिलन चौक तसेच बाबूपेठ परिसरातील वर्दळीच्या रस्त्यावरील सिग्नल बंद असल्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन होत आहे. त्यामुळे सर्व सिग्नल सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
गडचांदुरकरांना तालुक्याची प्रतीक्षा
चंद्रपूर : जिवती व कोरपना या दोन तालुक्यांची आर्थिक बाजारपेठ म्हणून गडचांदूर या शहराची ओळख आहे. दोन्ही तालुक्यातील एक मोठी बाजारपेठ म्हणून ख्याती आहे. या शहराला तालुक्याची नितांत गरत असून, ४० ते ५० हजार असलेल्या या शहराभोवती अनेक गावे वसलेली आहेत. गडचांदूर तालुक्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू असून, नागरिक अद्याप प्रतीक्षेतच आहेत.
रस्त्यावरील रेती टाकल्याने अडचण
चंद्रपूर : शहरातील बहुतांश रस्त्यावर रेती साचली असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे रेती उचलून रस्ते मोकळे करण्याची मागणी केली जात आहे. वाहने स्लिप होऊन अपघात होत आहे. काही नागरिकांनी घराचे बांधकाम करण्यासाठी रेती टाकली. ही रेती रस्त्यावर असल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचणी येत आहे. महापालिकेने याकडे लक्ष देवून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. शहरातील रस्ते अरुंद आहेत. त्यातही रस्त्यावर रेती टाकून ठेवण्यात येत असल्याने वाहन चालविताना अडचण जाते.
माणिकगड परिसरात पर्यटन सफारी सुरू करा
कोरपना : निसर्ग व वन संपदेने नटलेल्या माणिकगड परिसरात वन विभागाने पर्यटन सफारी सुरू करावी. तसेच येथील पर्यटनाला चालना द्यावी, अशी मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे. चंद्रपूर येथून सुरू करून अमलनाला धरण, शंकरदेव देवस्थान, विष्णू मंदिर, माणिकगड किल्ला, शंकरलोधी गुफा, पकडीगुद्दम धरण, कारवाई गुफा आदी धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांची भ्रमंती या पर्यटन सफारीत करता येऊ शकते. या माध्यमातून कोरपना व जिवती तालुक्यातील स्थळांना नवीन ओळख प्राप्त होईल. जिल्ह्यातील व अन्य ठिकाणांहून येणाऱ्या पर्यटकांना येथील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेता येईल. यासाठी वन विभागाने पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पर्यटन सफारी सुरू करण्यात आली आहे. त्यादृष्टीने येथेही पर्यटन सफारी सुरू केल्यास या भागातील लोकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होईल.
कव्हरेजअभावी भ्रमणध्वनी सेवा ठप्प
गोंडपिपरी : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भ्रमणध्वनी ग्राहक आहेत. मात्र, मागील अनेक दिवसांपासून कव्हरेजची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे भ्रमणध्वनीधारक त्रस्त असून अनेकांनी सीमकार्ड बदलवून नवीन सीम खरेदीला पसंती दिली आहे. काही महिन्यांपासून कंपन्यांच्या नेटवर्कमध्ये समस्या निर्माण झाली आहे.
लाभार्थ्यांना योजनेचा लाभ द्यावा
चंद्रपूर : श्रावणबाळ योजना, राजीव गांधी निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना अशा योजनेंतर्गत वृद्धांना मानधन देण्यात येते; मात्र या योजनेचा लाभ घेताना वृद्धांना खूप अडचणी जाणवतात. पैसे जमा होण्याची निश्चित तारीख माहीत नसल्यामुळे बँकेभोवती चकरा माराव्या लागतात. तासन्तास रांगेत उभे रहावे लागते. यामुळे शासनाने यात नियमितता ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे. कोरोनामुळे सर्वसामान्य अडचणीत आहेत. त्यातही मानधन थकीत असल्याने त्यांना संकटाला तोंड द्यावे लागत आहे.