राज्यात प्रथमच अंमलबजावणी : लोकप्रतिनिधीच्या सहभागातून योजना, परिपत्रक जारीचंद्रपूर : कुपोषणमुक्तीसाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेने आज जागतिक महिला दिनापासून ‘कुपोषित बालदत्तक योजना’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात प्रथमच ग्रामपंचायत स्तरावर ही योजना राबविण्यात येत आहे. त्याकरिता ग्रामपंचायत सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. याबाबत चंद्रपूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने ६ मार्च रोजी परिपत्रक जारी केले आहे.राज्याच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये व्हीसीडीसीमध्ये कमी वजनाच्या सॅम व मॅम बालकांवर लक्ष देण्यात येते. तसेच पुरक आहार पुरवठा, माता व बालकांचे समूपदेशन, अंगवाडीस्तरावर कुपोषणाचा आढावा घेण्यात येतो. परंतु ही अंमलबजावणी करताना स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग घेण्यात नाही. परिणामी हे विविध प्रयत्न केवळ शासकीय सोपस्कार ठरतात. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक बालकावर जाणीवपूर्वक उपाययोजना करण्याच्या उद्देशाने प्रथमच कुपोषणमुक्तीसाठी ग्रामपंचायत सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांना मोहिमेसोबत जोडून घेण्यात येत आहे. या संंदर्भात चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्ह्यातील पर्यवेक्षिकांना ६ मार्च रोजी एक परिपत्रक पाठविले आहे.महिला व बालकल्याण विभागाच्या पर्यवेक्षिकांच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या कुपोषित बालकांच्या घरी युद्धस्तरावर वारंवार भेटी देऊन आहार व आरोग्यबाबत कुटुंबाचे समूपदेशन करण्यात येणार आहे. त्यामध्ये संबंधित कुटुंबाच्या सोयीनुसार बालकांच्या वजनवाढीसाठी नियोजन करून दिले जाणार आहे. प्रत्येक केंद्रनिहाय कुपोषित बालकांच्या याद्या तयार करून त्यांच्या वजनवाढीच्या नियोजनाकरिता स्वतंत्र कार्ड तयार करण्यात येईल. संबंधित गावातील अंगणवाडीसेविकेवर समूपदेशनाची जबाबदारी न सोपविता पाच किमीच्या आतील अंगणवाडीकेंद्रातील एक सेविका घेऊन त्यांचे पथक तयार करण्यात येत आहे. त्या पथकाला आळीपाळीने दुसऱ्या गावात पाठविण्यात येणार आहे. सतत तीन महिने वजन वाढत नसलेल्या बालकांची वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत आरोग्य तपासणी करण्यात येईल. त्यापैकी सॅम व मॅम गटातील बालकांवर औषधोपचार करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)दत्तक योजनेतील घटकया योजनेत कुपोषित बालकांना दत्तक घेण्याची जबाबदारी ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्यासह तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, पर्यवेक्षिका, कुपोषण निर्मूलन समिती सदस्य आदींवर सोपविण्यात आली आहे. या दत्तक प्रक्रियेचे नियोजन तालुका बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना प्रकल्पस्तरावर करायचे आहे. या योजनेत कुपोषण निर्मूलनासाठी १४ उपाययोजना करण्यात येत आहेत.चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने ही दत्तक योजना तयार केली आहे. अशा प्रकारची योजना ग्रामपंचायत सदस्यांच्या स्तरावर राज्यात प्रथमच राबविण्यात येत आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून योजना सुरू करण्यात आली. या योजनेमुळे जिल्हा कुपोषणमुक्त होण्यास मदत होईल, असा विश्वास आहे.-संजय जोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर.
चंद्रपूर जिल्हा परिषद कुपोषित बालकांना घेणार दत्तक
By admin | Published: March 09, 2017 12:47 AM