चंद्रपूर : येथील धनोजे कुणबी समाज मंदिराचे अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम सातपुते यांची २० फेब्रुवारी रोजी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सल्लागारपदी नियुक्ती केली होती. या नियुक्तीचे पत्र सर्वत्र व्हायरलही करण्यात आले. मात्र, अवघ्या पंधरा दिवसांतच ॲड. सातपुते यांनी आपण या पदावर काम करण्यास व त्या पदाची जबाबदारी पार पाडण्यास असमर्थ असल्याचे पत्र धोटे यांना पाठविले आहे. त्यामुळे अवघ्या पंधरा दिवसांमध्येच ॲड. सातपुते यांनी पद का सोडले, याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे.
ॲड. सातपुते यांनी धोटे यांना पाठविलेल्या पत्रामध्ये आपण माझी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सल्लागारपदी निवड केली. त्याबाबत आभारी असल्याचे नमूद केले आहे. एवढेच नाही, तर माझ्या सामाजिक व व्यावसायिक व्यस्ततेमुळे या पदावर काम करण्यास व त्या पदाची जबाबदारी पार पाडण्यास आपण असमर्थ असल्याचेही म्हटले आहे. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत असतानाच ॲड. सातपुते यांनी काँग्रेसने बहाल केलेले पद सोडल्याने आता त्यांच्या पुढील भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वी माझी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीवर सल्लागारपदी नियुक्ती केली. मी सामाजिक क्षेत्रात काम करीत असून, माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. यासंबंधाने माझी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता काँग्रेसच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. यामुळे ती नियुक्ती मला मान्य नाही.-ॲड. पुरुषोत्तम सातपुते
अध्यक्ष, धनोजे कुणबी समाज मंदिर,चंद्रपूर