९ जुलै रोजी सुनील मडावी याला रेल्वे पोलिसांनी घरून संशयावरून नेले होते. त्यानंतर अनिलचा काहीही थांगपत्ता लागत नव्हता. अशातच सोमवारी रात्री अनिलची आई विमल मडावी यांना रेल्वे पोलिसांनी सुनीलच्या मृत्यूची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी मोबाइलवरून चंद्रपूरला येऊन सुनीलचा मृतदेह घेऊन जाण्याचा निरोप देण्यात आला. फिट आल्याने अनिलचा मृत्यू झाल्याचे कारण देण्यात आले. आपल्या मुलाचा रेल्वे पोलीस कोठडीत मारहाणीत मृत्यू झाल्याची तक्रार विमल मडावी यांनी विरूर पोलिसांत करून आधी चौकशी करा नंतरच मृतदेह ताब्यात घेऊ, अशी भूमिका घेतली. यानंतर माजी आमदार संजय धोटे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ही बाब आमदार सुधीर मुनगंटीवार यांना सांगितली. बुधवारी आमदार मुनगंटीवार व आमदार संजय धोटे यांच्यासह मृतकाच्या नातेवाइकांनी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांची भेट घेऊन घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. रेल्वे पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली. अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला. पोलीस अधीक्षकांनी सकारात्मक आश्वासन दिल्याने सुनीलचा मृतदेह नातेवाइकांनी स्वीकारला.
उच्चस्तरीय चौकशी करून गुन्हा दाखल करा : हंसराज अहिर
माजी केंद्रीय अर्थमंत्री हंसराज अहिर यांनीही सुनील मडावीच्या नातेवाइकांची विरूर येथे भेट घेऊन सांत्वन केले. यानंतर या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. रेल्वे पोलिसांनी सुनीलच्या मृत्यूचा बनाव केल्याचा आरोपही अहिर यांनी केला आहे.