वन्यप्रेमीत आनंद : प्रगणनेत प्रथमच वाघाची नोंदवरोरा : वनपरिक्षेत्र कार्यालय वरोरा अंतर्गत आठ हजार ५०० हेक्टर जमिनीवर जंगल आहे. या जंगलात वाघ वगळता अन्य वन्यप्राणी वास्तव्यास असल्याची आतापर्यंत नोंद होती. मात्र ५० वर्षानंतर प्रथमच नर वाघाचे वास्तव्य आढळून आले आहे. हे नुकत्याच झालेल्या प्रगणनेत सिद्ध झाले. प्रगणनेत प्रथमच वाघाची नोंद झाल्याने वन्यप्रेमीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.वरोरा वनपरिक्षेत्रांतर्गत नुकतीच १४ मचानीवरून वन्यप्राण्यांची प्रगणना करण्यात आली. २४ तास चाललेल्या प्रगणनेत वन विभागाचे ४० अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. यामध्ये प्रथमच टेमुर्डा उपवनक्षेत्रातील पानवठ्यावर प्रगणनेत वाघाचे वास्तव्य आढळून आले. वाघ नर जातीचा असून अडीत ते तीन वर्ष वयाचा असल्याची माहिती सुत्रांनी दिली. वाघासोबतच भेडकी ३५, चितळ १९८, निलगाय १४४, वानर १०८, रानकुत्रा एक, रानडुक्कर ४३८, उदमांजर १२, रान मांजर १५, बिबट एक, सायाळ ९, मुंगुस १२ व १३६ मोरांची नोंद झाली.वरोरा वनपरिक्षेत्रातील टेमुर्डा उपवनक्षेत्रातील पानवठ्यावर प्रथमच शिरगिनतीमध्ये वाघ आढळून आला. मागील काही महिण्यापासून या परिसरात वाघाचे वास्तव्य असल्याच्या पाऊल खुना जंगलात आढळून येत होत्या. परंतु प्रगणनेत वाघ आढळून आल्याने वाघाचे वास्तव असल्याचे सिद्ध झाले आहे.- रमेश तलांडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वरोरा
५० वर्षानंतर वरोरा वनपरिक्षेत्रात वाघाचे वास्तव्य
By admin | Published: May 24, 2016 1:23 AM