खोळंबलेली कामे जोमात : बा पावसा..ऽऽ, आता नको मारू रे दडी !चंद्रपूर: गेल्या एक महिन्यांपासून शेत आणि आभाळाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा मंगळवारी रात्री बरसलेल्या पावसामुळे सुखावला आहे. मंगळवारी रात्री दोन ते तीन तास दमदार पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी ८७.०२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात चंद्रपुरात सर्वाधिक १५८ मिमी पाऊस पडला. यामुळे खोळंबलेली शेतातील कामे पुन्हा जोमात सुरू झाली आहे. मात्र पाऊस पुन्हा दडी मारेल का, याची धडकी शेतकऱ्यांच्या मनात कायमच आहे.मागील वर्षीच्या दोन्ही हंगामात झालेले नुकसान यंदा तरी भरून निघेल, या आशेपोटी शेतकरी मोठ्या उत्साहाने जूनच्या प्रारंभीच खरीपासाठी तयार झाला होता. मशागतीची कामे आटोपली. सर्वात कठीण असलेली पैशाची जुळवाजुळवही केली. बियाणे, खतांची खरेदी केली. मृग नक्षत्राला पाऊस पडला की जोमात पेरणी करायची, असा त्यांंचा मानस होता. मात्र पावसाने मृगात निराशा केली. मृग लोटून पंधरवाडा उलटला. तरीही पावसाचे आगमन झाले नाही. त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला. जून महिन्याचा पंधरवडा उलटल्यानंतर अलनिनोच्या प्रभावामुळे आणखी काही दिवस पाऊस पडणार नाही, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे शेतकरी मोठ्या विवंचनेत सापडला होता.यंदा जिल्ह्यातील चार लाख ६० हजार ९२ हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाणार आहे. यात एक लाख २५ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली जाणार आहे. एक लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. यासोबतच एक लाख ७९ हजार हेक्टरवर भाताची लागवड करण्यात येणार असल्याचाही कृषी विभागाचा अंदाज आहे. एवढे मोठे खरिपाची लागवड होणे पावसाअभावी शिल्लक होते. त्यामुळे शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करीत होता. जूनचा अखेरचा आठवडाही सुरू झाला. तरीही पावसाची चिन्ह नव्हती. उलट उन्हाची काहिली जाणवत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना २०१२ चा दुष्काळ आठवू लागला होता. अशातच मागील महिन्यात चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जमिनीत पाणी साचले नसले तरी जमीन बऱ्यापैकी ओली झाली होती. त्यामुळे पहिल्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी जमीन ओली होताच पेरणीची कामे सुरू केली आहे. अनेकांच्या पेरण्या झाल्या. मात्र त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारली. जून महिन्याचा एक दिवस अपवाद वगळला तर संपूर्ण महिनाच कोरडा गेला. यामुळे शेतकऱ्यांनी केलेली पेरणी वाया गेली. बियाणे मातीतच सडून गेले. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. जुलै महिन्याचा पहिला आठवडा लोटला तरी पावसाची चिन्ह नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांसह उद्योजक व सर्वसामान्य नागरिकही चिंताग्रस्त झाले होते. संपूर्ण जिल्हाच पाणी टंचाईच्या सावटात होता. दरम्यान, मंगळवारी रात्री ३ वाजताच्या सुमारास जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. तब्बल दोन-अडीच तास पाऊस पडत राहिला. सर्वत्र पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यातही वाढ झाली आहे. या पाण्यानेबळीराजा तुर्तास सुखवला आहे. मात्र पुढे पाऊस पुन्हा दडी मारेल का, याची चिंता आहेच. (शहर प्रतिनिधी)
अखेर बरसला मान्सून
By admin | Published: July 09, 2014 11:20 PM