चंद्रपूर: सर्वोच्च न्यायालयाने शंकरपटावरील बंदी उठविल्याने जिल्ह्यातील पटप्रेमींमध्ये जल्लोष व्यक्त करण्यात येत असून आता पुन्हा एकदा जिल्ह्यातील शंकरपटांना जुने वैभव प्राप्त होणार असल्याने पटप्रेमींमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.नागभीड तालुक्यातील म्हसली येथील शंकरपटाला १५० वर्षांची परंपरा आहे. मात्र न्यायालयाने शंकरपटावर बंदी घातल्याने म्हसली येथील प्रसिद्ध शंकरपट भरविणे बंद झाले होते. मात्र आता म्हसलीचा शंकरपट पुन्हा सुरू होणार असल्याने पटप्रेमी खूष आहेत. त्याच तोलामोलाचा शंकरपट सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी येथेही भरत असे. बंदीनंतर हा शंकरपटही भरविणे बंद झाले. मात्र आता म्हसली व देलनवाडी येथील शंकर पट पुन्हा एकदा सुरू होणार आहेत.म्हसली येथील शंकरपटाचा एक इतिहास आहे. या शंकरपटात केवळ चंद्रपूर जिल्ह्यातीलच नाही तर पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोलीसह नागपूर, वर्धा, यवतमाळ येथील बैलजोड्या सहभागी होत असत. १ मेपासून सुरू होणारा हा शंकरपट जून महिन्याच्या अखेरपर्यंत चालत असे. त्यामुळे या काळात दररोज म्हसली येथे हजारो लोक शंकरपट पहायला यायचे. त्यामुळे या गावाला दरवर्षी शंकरपटाच्या काळात जत्रेचे स्वरूप यायचे. यातून मोठी आर्थिक उलाढालही होत असे. या ठिकाणी दररोज २०० पेक्षा अधिक चारचाकी वाहने व ५०० पेक्षा अधिक दुचाकी वाहनांनी लोक शंकरपट पहायला यायचे. २५ ते ३० हजार लोक शंकरपट पहायला येत असत. मात्र शंकरपटावर बंदी घालण्यात आल्याने शंकरपटाचे वैभव काही काळासाठी लोप पावले होते. मात्र आता बंदी उठल्याने शंकरपटाला जुनेच दिवस येतील, अशी अपेक्षा पटप्रेमींमध्ये व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
बंदी उठल्याने शंकरपट प्रेमींमध्ये आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2016 1:15 AM