सत्तेत आल्यानंतर भाजपला आश्वासनपूर्तीचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 12:53 AM2018-07-02T00:53:56+5:302018-07-02T00:54:31+5:30
मत घेण्यासाठी भाजप जनतेला केवळ आश्वासने देत आहे. २०१४ च्या निवडणूक प्रचारात भाजपाने प्रत्येक क्षेत्रासाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही केलेली नाही. शेतमालाला दीडपट हमी भाव, वर्षाला दोन कोटी बेरोजगारांना रोजगार, १५ लाख रुपये प्रत्येकाच्या बँक खात्यात, सन २०१९ पर्यंत सर्वांना घरे यासह अनेक आश्वासनाची खैरात वाटली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : मत घेण्यासाठी भाजप जनतेला केवळ आश्वासने देत आहे. २०१४ च्या निवडणूक प्रचारात भाजपाने प्रत्येक क्षेत्रासाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही केलेली नाही. शेतमालाला दीडपट हमी भाव, वर्षाला दोन कोटी बेरोजगारांना रोजगार, १५ लाख रुपये प्रत्येकाच्या बँक खात्यात, सन २०१९ पर्यंत सर्वांना घरे यासह अनेक आश्वासनाची खैरात वाटली होती. परंतु, बहुमतातल्या या सरकारला सत्तेत चार वर्षे होवून सुद्धा दिलेली आश्वासने पूर्ण करता आले नाही. त्यामुळे भाजपची उलटी गंगा संपूर्ण देशात वाहत असल्याचा आरोप माजी खासदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
येथील तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भद्रावती येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ. आसावरी देवतळे, काँग्रेस नेते तथा कार्यक्रमाध्यक्ष डॉ.विजय देवतळे, शहर काँग्रेस अध्यक्ष दिलीप ठेंगे, जेष्ठ काँग्रेस नेते मनोहर पाटील ताजने, इंटक नेते धनंजय गुंडावार, धर्मेंद्र हवेलीकर, डॉ.बी.प्रेमचंद, वरोराचे माजी नगराध्यक्ष विलास टिपले, प्रेमदास आस्वले, माजी नगराध्यक्ष सरिता सूर, महिला तालुका काँग्रेस अध्यक्ष लिला नवले, नगरसेवक अल्का सातपुते, शेखर रंगारी, माजी पं.स. सभापती परशुराम जांभूळे, हरिश दुर्योधन, विलास खडके, शंकर बोरघरे, वैशिष्ठ लभाने, सतीश वानखेडे, पं.स. सदस्य चिंतामन आत्राम, सुधाकर आत्राम, भानुदास गायकवाड आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण बोढाले यांनी केले. संचालन प्रा. रविकांत वरारकर तर आभार तालुकाध्यक्ष भगतसिंग मालूसरे यांनी केले. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव
खोटे आश्वासन देवून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारला २०१९ च्या निवडणुकीत भारत मुक्त करण्याकरिता काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या घराघरात जावून त्यांच्या खोटारडेपणाची माहिती द्यावी, असे आवाहन नाना पटोले यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. जीएसटी लादून भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेचा खिशात हात घातला आणि या सर्वसामान्य जनतेचा पैसा निरव मोदी आणि अन्य भांडवलदारांच्या घशात घातला. देशातील एक लाख जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा खेळ सरकारने चालविला आहे. यात गरीबांचे मुले शिक्षण घेत आहेत. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप यावेळी केला.