नागपूर : वनरक्षक स्वाती ढुमणे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर सोबत फक्त तीन ते चार वन मजूर असल्याची बाब पुढे आली होती. त्यानंतर जंगलात काम करताना समूहसंख्येचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला होता. मुख्यमंत्र्यांकडेही या संदर्भात मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने ही समूहसंख्या २० ठरविली आहे. हीच संख्या राज्यातील अन्य व्याघ्र प्रकल्पांमध्येही गृहीत धरली जाण्याची शक्यता आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने या संदर्भात २४ नोव्हेंबरच्या सायंकाळी एक परिपत्रक जारी करून ही संख्या ठरविली आहे. यासोबतच जंगलात काम करताना काही महत्त्वाचे निर्णयही घेतले आहेत. त्यानुसार, प्राण्यांचे अधिकास व्यवस्थापन, जाळरेषा व्यवस्थापन या बाबी शक्यतो यांत्रिक पद्धतीने करण्याच्या सूचना काढल्या आहेत. वनरक्षक, मदतनीस आणि रोजंदारी मजूर हे एकाच ठिकाणी येऊन काम करतील, ही संख्या किमान २० असेल, तसेच वनपाल स्वत: उपस्थित राहून सुरक्षेवर नियंत्रण ठेवतील, असे आदेश काढले आहेत. या समूहाच्या मदतीसाठी एक चारचाकी वाहन उपलब्ध ठेवण्याची दक्षता संबंधित वनक्षेत्रपालाने घ्यावी, असेही या आदेशात म्हटले आहे.
माया वाघिणीने केलेल्या हल्ल्याच्या घटनेत ही वाघीण समोर असल्याचे दिसले. स्वाढी ढुमणे आणि वनमजुरांना दिसले होते. मात्र, अशा वेळी काय करावे, याबद्दल दिशानिर्देश नसल्याने पुढील निर्णय घेता आला नाही किंवा त्यांनी काम अर्धवट सोडून परत फिरण्याचाही निर्णय घेतला नाही. ही बाब या घटनेत मृत्यूला निमंत्रण देणारी ठरली. यामुळे घेऊन पायदळ गस्तीच्या वेळी धोकादायक वन्यप्राणी आढळल्यास तत्काळ परत फिरून सुरक्षित ठिकाणी जावे, बिनतारी संदेश यंत्रणेमार्फत परिक्षेत्र कार्यालयाला सूचित करावे, असे आता ठरले आहे.
मायाच्या वावरक्षेत्रात पायदळ फिरण्यास मज्जाव
माया वाघिणीचा वावर असलेल्या क्षेत्रामध्ये यापुढे पायदळ गस्त घालण्यास तसेच वाहनाखाली उतरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच मानव-वन्यजीव संघर्षात मदतीसाठी जाणाऱ्या विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या जवानांनी वन्यप्राण्यांच्या जवळ विनानियोजनाने जाऊ नये, असेही आदेश काढण्यात आले आहेत.
...